The Magh Yatra concluded with great enthusiasm in Anwa village.
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र आन्वा येथे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या माघी वारी उत्सवाची सांगता अत्यंत भक्तीमय वातावरणात झाली. यात काल्याच्या कीर्तनसे-वेसाठी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या कंठी धरिला कृष्ण मणी, अवघा जनी प्रकाश या अभंगावर विस्तृत निरुपण करताना प.पू. ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी भक्ती आणि ज्ञानाचा सुंदर संगम उपस्थितांसमोर मांडला.
संतश्री विठोबा दादा महाराज चातुर्मास्ये संस्थानचे १५ वे विद्यमान पीठाधिश प.पू. सद्गुरु श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्ये यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि दहीहंडी फोडून या सोहळ्याची सांगता झाली. यावेळी मराठवाड्यासह राज्यभरातून आलेल्या भाविकांची अलोट गर्दी झाली होती.
ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी निरुपणात म्हणाले की, ज्याप्रमाणे एखादा तेजस्वी मणी अंधारात प्रकाश देतो, त्याप्रमाणे कृष्ण मणी म्हणजेच भगवंताचे नामस्मरण ज्याच्या कंठात वसते, त्याचे संपूर्ण आयुष्य उजळून निघते. हा प्रकाश केवळ स्वतःपुरता मर्यादित नसून अवघा जनी प्रकाश म्हणजे त्या भक्ताला प्रत्येक माणसामध्ये, प्राण्यामध्ये आणि चराचरात पांडुरंगाचे रूप दिसू लागते असे नामस्मरणामुळे माणसाचा अहंकार गळून पडतो आणि खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित होते, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
कीर्तनाच्या उत्तरार्धात गोप-ाळकाला साजरा करण्यात आला. यावेळी पुंडलिक वरदे हरी विठ्ठलच्या जयघोषात महाराजांच्या हस्ते संतश्री विठोबादादामहाराज समाधी मंदिर परिसरात दहीहंडी फोडण्यात आली. दहीहंडी फुटताच भाविकांनी प्रसादासाठी मोठी गर्दी केली होती. कीर्तनसेवेनंतर महाराजांच्या हस्ते काल्याचा प्रसाद देण्यात आला.
चोख नियोजन
गेल्या चार दिवसांपासून आन्वा नगरीत सुरू असलेल्या या भक्तीमय सोहळ्यामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. संस्थानच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी चोख नियोजन करण्यात आले होते.