जालना, पुढारी वृत्तसेवाः दिवाळी सण व सुट्ट्यांचा आनंद घेउन अनेक नागरिक आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाले असल्यामुळे जालना येथील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. संपूर्ण बसस्थानक प्रवाशांनी फुलून गेले असून सकाळपासूनच बसस्थानकावर प्रवाशांची ये-जा वाढली आहे. दुपारच्या सुमारास गर्दीने उच्चांक गाठल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बसस्थानकावर महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांची मोठी संख्या दिसून येत आहे. हातात सामानाच्या बॅगा घेऊन अनेक प्रवासी बसची वाट पाहत उभे आहेत. बस येताच इच्छित ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची चढण्याकरिता धावपळ सुरू होत आहे. शिवाई इलेक्ट्रिक बस तसेच साध्या एसटी बसेसमध्येही प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या वाढली असताना बसची संख्या अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. प्रवाशांना बसस्थानकावरच . बसची वाट पहावी लागली.
बस संख्या अपुरी
सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने जालना बसस्थानकातून विविध मार्गावर जादा बसेस सोडल्या असल्या तरी बसेसची संख्या कमी पडत असल्यामुळे जादा बसेस सोडण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करून बससेवा सुरळीत ठेवावी, अशी अपेक्षाही नागरिक व्यक्त करीत आहेत.