Temperatures in the district have dropped, the cold has intensified
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसापासुन तापमानात घट होत असल्याने थंडीत वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. जालना शहरात रविवारी तापमानाचा पारा १२ अंश सेल्सीअस पर्यंत खाली आल्याने थंडीत वाढ झाल्याचे दिसुन आले.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत असून, हा जोर आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. थंडीच्या या कडाक्यामुळे सकाळी कार्यालयीन कामासाठी बाहेर पडणारे नागरिक, शाळेत जाणारे विद्यार्थी, बाजार समितीत भाजीपाला विक्रीस आणणाऱ्या शेतकयांना हुडहुडी भरत आहे.
मागील आठवड्यात थंडीचा जोर कमी होता. मात्र दोन दिवसांपासून थंडीने पुन्हा जोर धरल्याने शहर गारठले आहे. रविवारी शहरात कमाल तापमान २८ तर किमान १२ अंश सेल्सिअसची नोंद झाली. मागील दोन दिवसांपासून परिसरात थंडीचा प्रचंड कडाका वाढला आहे. ग्रामीण भागात तापमानाचा पारा शहरी भागापेक्षा अधिक खाली आल्याने थंडीचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान कमालीच्या थंडीने जनजीवन पुर्णतःविस्कळीत झाले आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. किमान तापमानात घट झाल्याने थंडीची लाट आली आहे. थंडीमुळे जालनेकर चांगलेच गारठले आहेत. दुपारच्यावेळी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे.
तर पहाटे थंडीचा कडाका वाढला आहे. अवकाळी पावसामुळे थंडीचे आगमन लांबणीवर पडले होते. मात्र दिवाळीत पडणाऱ्या थंडीने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच डोके वर काढले आहे. जिल्ह्यात किमान तापमानात घट झाल्याने थंडीचा जोर वाढला आहे.
विक्रीत वाढ
जालना शहरातील नेपाळी माकेटमधे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही बाहेरुन आलेल्या नागरिकांनी उबदार कपडे विक्रीची दुकाने थाटली आहेत. थंडीमुळे स्वेटर व इतर गरम कपड्यांची मागणी वाढल्याने दुकानदारांनी स्वेटरसह इतर गरम कपड्यांचे भाव वाढविल्याचे दिसत आहे. भाव वाढले असले तरी स्वेटरसह इतर उबदार कपडे विकत घेण्यासाठी बाजारात नागरिकांची गर्दी दिसत आहे.