तळणी : शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील पूर्णा पाटीजवळ मंगळवारी (ता. २०) सकाळी आठच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार प्रवीण चव्हाण (२५)( रा. डोंगरगाव) हा गंभीर जखमी झाला असून, त्यांच्या भाच्यालाही दुखापत झाली. जखमींना उपचारासाठी नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिका तब्बल एक तास उशिराने पोहोचल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.
प्रवीण चव्हाण हे श्रीराम तांड्यावरून भाच्याला घेऊन दुचाकी (क्र.एमएच ३८- एबी ६५१६) वरुन गावाकडे जात होते. यावेळी बुलढाणा-मेहकर-परभणी-अहमदपूर मार्गावरील एसटी बस (क्र.एमएच १३ सीयू ७४५८) दुचाकीला धडक झाली. यात चव्हाण यांच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच मंठा पोलिस ठाण्याचे बीट जमादार रखमाजी मुंढे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बस व दुचाकी ताब्यात घेऊन मंठा पोलिस ठाण्यात नेली.अपघातानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला असता, ‘ऑन द वे’ असे उत्तर मिळत होते, अशी तक्रार नातेवाइकांनी केली. रुग्णवाहिकेची प्रतीक्षा न करता जखमींना उपचारासाठी नेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नायगाव टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेचा संपर्क क्रमांक सर्वसामान्यांना माहिती व्हावा, यासाठी जनजागृती करण्याची मागणी नागरिकांनी केली.
यांनी दिली भेट
परतूर आगाराचे एस. एम. शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातग्रस्ताला महामंडळाकडून थेट मदत मिळू शकत नसल्याचे सांगत, नुकसानभरपाईसाठी न्यायालयामार्फत प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच, नियमानुसार संबंधित एसटी चालकावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी माहितीही त्यांनी दिली.