

मिरा रोड: पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मध्यरात्री बेकायदा शिरून रानडुकराची शिकार करताना झालेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.
विजय सुखरू सापटे (वय ६०, रा. बेलखडी पाडा, चेना गाव) असे मृताचे नाव असून ते महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते.
पोलिसांना कोणतीही माहिती न देता आणि शवविच्छेदन टाळून पहाटेच मृतदेहावर अंत्यसंस्कार उरकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात कथित बनावट मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरसह चार ते पाच जणांना काशीगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेना गाव परिसरातील जंगलात ५ ते ६ जणांचे पथक बंदुका, छरे व इतर शिकारी साहित्यासह रानडुकरांच्या शिकारीसाठी गेले होते. या पथकात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे समजते.
मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास बॅटरीच्या प्रकाशात शिकार सुरू असताना अंधारात प्राण्याचे डोळे चमकल्याचा भास होऊन गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात विजय सापटे यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याच घटनेत कुणाल शेलार यांच्या मांडीला गोळी लागली तर कल्पेश ढगळा यांच्या खांद्याला गोळी लागून दुखापत होऊन हे दोघे जखमी झाले.
दोघांवर सध्या काशीगाव येथील आशिष रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, पोलिसांच्या चौकशीत शिकारीदरम्यान गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आल्याचे सांगितले जात आहे.
सुरुवातीला नदीत स्फोटक टाकून मासेमारी करताना स्फोट होऊन छरे लागल्याचा बनाव जखमींनी रचला होता.
मात्र, घटनास्थळाची पाहणी केली असता तिथे रक्ताचे डाग आढळले आणि चौकशीत विसंगती दिसून आल्याने हा प्रकार शिकारीदरम्यान झालेल्या गोळीबाराचा असल्याचे उघडकीस आले. घटनेनंतर विजय सापटे यांचा मृत्यू घरीच हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र एका खासगी डॉक्टराकडून मिळवण्यात आले.
पोलिसांना कोणतीही खबर न देता घाईघाईने पहाटेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
या संशयावरून संबंधित डॉ. राजेश पालांडे, महेश गायकर, कातोड बिस्तूर लाभड यांना ताब्यात घेऊन विचारपूस व अधिक तपास करून कारवाई केली जाणार आहे.
उद्यानातील वन्यजीवांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
संरक्षित वनक्षेत्रात शस्त्रास्त्रांसह प्रवेश करून शिकार करण्याचा प्रकार समोर आल्याने राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात सदोष मनुष्यवध, पुरावे नष्ट करणे यांसह वनविभागाकडून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. मिरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखा-१ आणि काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.