तळणीः आगीत भस्मसात झालेले शेड दिसून येत आहे.  pudhari photo
जालना

Jalna Fire : शेतकऱ्याच्या संसाराची राखरांगोळी; शेडला आग

तळणी : कानडी येथील घटना, पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

तळणी : तळणी परिसरातील कानडी शिवारात गट क्रमांक २८ मधील शेतातील टिनपत्राच्या शेडला आग लागून शेतकरी विनोद बाबूराव राठोड (रा. लिबखेडा, ता. मंठा) यांचे मोठे नुकसान झाले. या आगीत शेतमालासह संसारोपयोगी साहित्य आणि शेतीची अवजारे जळून खाक झाली. दिवाळीच्या सणातच या शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळल्याने कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, विनोद राठोड हे शेतातच वास्तव्यास होते. मात्र, दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी ते कुटुंबासह गावी गेले होते. याच काळात त्यांच्या शेतातील टिनपत्राच्या शेडला आग लागली. आगीत साठवून ठेवलेला पाच क्विंटल कापूस, दहा क्विंटल सोयाबीन, घरातील खाण्याचे धान्य, स्प्रिंकलर संच, टीव्ही, गॅस, शेतीची अवजारे तसेच इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.

आगीत शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टाची कमाई आणि संसारोपयोगी वस्तूंची राख झाली आहे. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या राठोड कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे.

खरिपापाठोपाठ रब्बी हंगाम ही शेतकरी वर्गाच्या हातून गेला आहे. सततच्या संकटाने तळणी परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT