Sunhouse scheme, allegations of restrictions wrong
जालना, पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्याच्या क्षमतेच्या बाबतीत महावितरणने निर्बंध लादल्याचा सौरऊर्जा प्रकल्प पुरवठादारांचा आरोप चुकीचा असल्याचे महावितरणने म्हंटले आहे. अधिक क्षमतेची रास्त गरज असलेल्या वीज ग्राहकांना महावितरणकडून तपासणीनंतर मंजुरी देण्यात येत आहे.
सामान्य घरगुती ग्राहकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेत पुरवठादारांच्या दबावामुळे ग्राहकांचे नुकसान होऊ नये, यासाठी महावितरणकडून दक्षता घेण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात ७ हजार ६६८ ग्राहकांनी घराच्या छतावर सौर उर्जा प्लेट या योजनेतून बसविले आहे. या सौर उर्जेव्दारे २७.०१ मेगावॅट क्षमतेची विज तयार होत आहे.
दरम्यान प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही सामान्य घरगुती ग्राहकांसाठी आहे. तथापि, नियमित घरगुती वीज पुरवठ्याच्या गरजेपेक्षा खूप जास्त क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसवायचा, केंद्र सरकारकडून अनुदान घ्यायचे, नंतर त्या कनेक्शनचे रुपांतर वाणिज्यिक कनेक्शनमध्ये करून अनुदानाचा गैरफायदा घ्यायचा, असे प्रकार घडल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले.
महावितरणकडे अशा तक्रारी आल्या होत्या की, वीज ग्राहकांचा विजेचा वापर कमी असल्याने त्यांची एक किंवा दोन किलोवॅटच्या प्रकल्पाची गरज असताना पुरवठादारांकडून त्यांच्यावर अधिक क्षमतेचा प्रकल्प बसविण्यासाठी दवाव आणण्यात येत आहे. यामुळे गरज नसताना संबंधित घरगुती ग्राहकावर जास्त क्षमतेच्या प्रकल्पाच्या खर्चाचा बोजा पडतो.
हे ध्यानात घेऊन महावितरणने ग्राहकांचा प्रत्यक्ष विजेचा वापर किती आहे हे ध्यानात घेऊन त्यानुसार स्वयंचलित व्यवस्थेत विजेच्या मंजूर भाराला (लोड) मान्यता देण्याची व्यवस्था केली. त्यानुसार त्या ग्राहकाला सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविता येतो. तथापि, ग्राहकाच्या नियमित वीज वापरापेक्षा खूप जास्त क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याची मागणी आली तर महावितरणकडून ती स्वयंचलित पद्धतीने मंजूर केली जाणार नसून त्यासाठी महावितरणकडून तपासणी केली जाईल.
स्मार्ट योजना
या योजनेचा वापर करून महावितरणने संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी सौरग्राम योजना सुरू केली असून आतापर्यंत १७ गावे सौरग्राम झाली आहेत. तसेच राज्य सरकारने या योजनेत वीज ग्राहकाला मिळणाऱ्या अनुदानात स्वतःकडून भर घालून दारिद्र्यरेषेखालील पाच लाख कुटुंबांना अत्यंत कमी रकमेत योजनेचा लाभमिळवून देणारी स्मार्ट योजना सुरू केली आहे.