Sunetra Pawar should be cautious; some people might conspire against her: Manoj Jarange
वडिगोद्री, पुढारी वृत्तसेवा राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या ही जमेची बाजू असली, तरी सुनेत्रा पवार यांच्याभोवती आता अशा गिधाडांनी घिरट्या घालण्यास सुरुवात केली आहे, जी अजितदादांच्या काळात कधीच दिसली नाहीत. या अचानक जमा झालेल्या ढेकणांवर वहिनींनी लक्ष ठेवावे, अन्यथा हीच लोकं त्यांचा घात करू शकतात, असा खळबळजनक इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी येथे दिला.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताच, जरांगे पाटील यांनी त्यांना राजकीय वास्तवाची जाणीव करून दिली. वडिगोद्री येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पवारांच्या राजकीय भविष्याबाबत आणि अंतर्गत आव्हानांवर भाष्य केले.
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, "अजितदादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी सर्वांना सोबत घेऊन चालावे. सध्या त्यांच्या आसपास फिरणारी ढेकणं खूप रक्त पिऊ शकतात. अशा वेळी केवळ पवार कुटुंबच तुमच्या कामाला येईल, हे विसरू नका. सुनेत्रा वहिनींनी तातडीने पद स्वीकारले असले, तरी पार्थ आणि जय यांनी दादांनी दिलेल्या सल्ल्यांचे तंतोतंत पालन करावे.
राजकारण हे काटेरी रस्ता आहे, त्यावर पावले जपून टाकावी लागतील अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करताना जरांगे म्हणाले की, "यामागे काही राजकारण आहे का, याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. माझ्याही घातपाताच्या प्रकरणातील तपास अहवालाचे काय झाले? मी पुन्हा एकदा माझ्यावरील घातपाताच्या तपासाची मागणी करणार आहे.
बीडच्या पालकमंत्रिपदावर टोलेबाजी
बीडच्या पालकमंत्रिपदाच्या चर्चेवर बोलताना त्यांनी नाव न घेता टीका केली. हे कुठेही पळतं, पण याला काही मिळत नाही. देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांइतकेच हुशार आहेत, ते अशांना जवळ करणार नाहीत. या लोकांपासून सावध राहणेच गरजेचे आहे, असा टोला लगावला.
पवार-ठाकरे एकीचे आवाहन
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य करताना त्यांनी विरोधी पक्ष प्रबळ होणे आवश्यक असल्याचे सांगितले. पवार आणि ठाकरे कुटुंबियांनी एकसंघ होऊन राज्यात मुसंडी मारण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, तरच सत्तेला आव्हान देणे शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.