शरद मुळे
सुखापुरी : एकीकडे दुष्काळाच्या झळांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पीककर्जाच्या पुनर्गठनासह वसुलीला स्थगिती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बँकांना दिल्याची बातमी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलल्याचे या वृत्तातून स्पष्ट झाले. मात्र, अंबड तालुक्यातील सुखापुरीसह परिसरातील शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज घेताना ‘सिबिल स्कोअर’चा अडसर येत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने प्रशासनाच्या निर्देशांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय का? असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा बँकर्स समितीच्या अध्यक्षा आशिमा मित्तल यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बँकांना विविध महत्त्वपूर्ण निर्देश दिल्याचे प्रसिद्ध वृत्तात नमूद आहे. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुनर्गठन करणे, कर्जवसुलीला स्थगिती देणे, तसेच पात्र शेतकऱ्यांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे.
दुष्काळी अनुदान, घरकुल, पीकविमा आणि अन्य शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठीही बँकांनी कार्यवाही करावी, असे निर्देश असल्याचे या वृत्तातून समोर आले आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नव्या पीककर्जासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारींमुळे बँकांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
रूई, सुखापुरी, लखमापुरी, वडीकाळ्या, रेवलगाव, कुक्कडगाव, बेलगाव, दहेगाव खुर्द, आणि भारडी परिसरातील शेतकरी यंदाच्या कमी पावसामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी खत, बियाणे, औषधे आणि मजुरीवर खर्च केला. मात्र, अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतीचा खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत पुढील हंगामासाठी भांडवल उभे करायचे कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर नव्याने पीककर्ज उपलब्ध होईल, या अपेक्षेने शेतकरी बँकांकडे जात आहेत. मात्र, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या तीर्थपुरी शाखेत सिबिल स्कोअरचा मुद्दा उपस्थित करून कर्ज मिळण्यात अडथळे येत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. विशेषतः दुसऱ्या कर्जदाराला जामीनदार असल्याचे कारण पुढे करून कर्ज नाकारले जात असल्याचा आरोप आहे.
बेलगाव येथील शेतकरी अमोल बाबासाहेब मोताळे यांनी नव्या पीककर्जासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या तीर्थपुरी शाखेत संपर्क साधला असता, त्यांना जामीनदार असल्याचे कारण सांगून कर्ज नाकारण्यात आल्याचा आरोप आहे. त्यांच्या सिबिल अहवालात दुसऱ्या शेतकऱ्याच्या कर्जासाठी जामीनदार असल्याची नोंद दिसत असल्याचे शाखा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आल्याचे मोताळे यांचे म्हणणे आहे.