Sugarcane season start Ghansawangi
अविनाश घोगरे
घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात ऊस गळीत हंगामाची चाहूल लागली असून ऊसतोड कामगारांच्या टोळ्या गावोगावी दाखल होऊ लागल्या आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागात ऊसतोडणीची लगबग सुरू झाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बीड, लातूर, नांदेड, परभणी, आदी जिल्ह्यांमधून ऊसतोड मजुरांच्या टोळ्या ट्रॅक्टर, ट्रक आदी वाहनातून तालुक्यात दाखल होत आहेत. पहाटेपासून रात्रीपर्यंत ऊसतोड मजुरांची वाहनांची वर्दळ सुरू असून गावोगावी पुन्हा एकदा ऊसहंगामाचे चित्र रंगू लागले आहे. मजुरांच्या राहण्यासाठी मोकळ्या शेतात. गावाजवळील मोकळ्या जा-गेवर. पाल उभारण्यात येत आहेत. शेतकरीही ऊसतोडणीसाठी सज्ज झाले आहेत. शेतकरी येणाऱ्या मजुरांसाठी शेता जवळील मोकळे जा- गेवरील निवासा साठी, लाईट सह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना दिसत आहे.
दरम्यान, तालुक्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगामासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. मशिनरी तपासणी, बॉयलर चाचणी, वाहतुकीची व्यवस्था यासाठी कारखाना प्रशासन व्यस्त आहे. काही दिवसांतच कारखान्यांच्या बॉयलरमधून धूर निघताना दिसेल आणि गाळप हंगामाचा शुभारंभ होईल. ऊस हा तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रमुख नगदी पीक असून, या हंगामावर ग्रामीण अर्थचक्र मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. "ऊसाला चांगला दर मिळावा आणि हंगाम निर्विघ्न पार पडावा," अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ऊसतोड मजुरांची वर्दळ, ट्रॅक्टरचा आवाज, शेतातील हालचाल आणि कारखान्यांची तयारी या साऱ्यामुळे गाळप हंगामाच्या सुरुवातीचा उत्साह दिसून येतो.
ऊस तोडणी सुरू
ऊसतोड मजुरांची गर्दी, ट्रॅक्टरचा आवाज, शेतातील हालचाल आणि कारखान्यांची तयारी यामुळे ऊसहंगामाचे वातावरण चांगलेच रंगू लागले आहे. या मजुरांच्या आगमनाने ग्रामीण भागात हालचाल वाढली असून ऊसाच्या शेतांमध्ये पुन्हा एकदा कामगारांची वर्दळ दिसून येणार आहे.