घनसावंगी ः उसाच्या दराबाबत साखर कारखान्यांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे व अपुऱ्या दरामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.18) रोजी तीर्थपुरी येथे इशारा सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
अंबड-घनसावंगी तालुक्यातील उस उत्पादक शेतकरी आपल्या न्याय हक्कांसाठी एकवटले असून, युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने विविध गावांमध्ये जनजागृती बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकींना मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहत असून, सध्याच्या दरामुळे शेती खर्चही निघत नसल्याची तीव्र भावना व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये उसाला पहिल्या उचल दरात 3,200 रुपये प्रति टन व अंतिम दर 3,500 रुपये प्रति टन जाहीर करण्यात यावा, तसेच मागील हंगामातील थकीत उस बिलांची तत्काळ अदा करण्यात यावी, अशी ठाम मागणी आहे. वाढते खत, औषध, मजुरी आणि वाहतूक खर्च लक्षात घेता सध्याचा दर शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. कारखान्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल न करता तातडीने दर जाहीर करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलन छेडण्याचा इशारा
युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध ठिकाणी बैठका व संपर्क मोहीम राबवली जात असून, प्रशासन व साखर कारखाना व्यवस्थापनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.