जालना : ऑनलाईन पद्धतीने तलवार मागवून धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या एका युवकावर कदीम जालना पोलिसांनी कारवाई करत तलवार, चाकू व खंजीर असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवार (15 ) रोजी रात्री करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदीम जालना पोलिस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना शिवनगर परिसरात एक युवक धारदार तलवार व खंजीर जवळ बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती पथकास मिळाली.
पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून रात्री सुमारे पावणे दहा वाजता संशयित युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव यश संतोष जाधव ( रा. शिवनगर जुना जालना) असल्याचे सांगितले.
झडतीदरम्यान त्याच्या पाठीमागील बॅगेतून 6 हजार 500 रुपये किमतीची लाल रंगाची धारदार पात्याची तलवार, 800 रुपये किमतीचा धारदार चाकू व 1 हजार 200 रुपये किमतीचा काळ्या रंगाचा धारदार खंजीर असा 8 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत संबंधित तलवार ऑनलाईन मागविल्याचे निष्पन्न झाले. परवानगीशिवाय धारदार शस्त्रे बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजबीरसिंह संधु, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे, जमादार सदा राठोड, सचिन चौधरी, पोलिस कर्मचारी गायकवाड, ा शेख , इम्रान खान यांनी केली.
चिंता वाढली
जालना शहरात ऑनलाईनसह पोस्टानेही धारदार तलवारी व इतर हत्यारे मागविण्यात येत असल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. शहरात गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारीत वाढ झाली असतानाच आता अवैध हत्यारानेही डोके वर काढले आहे.