जालना ः शाहिरी प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ शाहीर बजरंग अंबी. pudhari photo
जालना

Bajrang Ambi : शाहिरीत असावी शब्दांची धार

ज्येष्ठ शाहीर बजरंग अंबी यांनी केले उद्बोधन

पुढारी वृत्तसेवा

जालना : शाहिरी ही केवळ करमणुकीचे साधन नसून ते समाजप्रबोधनाचे प्रभावी शस्त्र आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या ममतेने मुलाला आणि कुटुंबाला योग्य दिशा देते, त्याचप्रमाणे समाजातील अनिष्ठ प्रथांवर प्रहार करताना शाहिराने आईच्या ममतेने समाजाला योग्य वाट दाखवली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शाहीर बजरंग अंबी यांनी केले.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि येथील जेईएस महाविद्यालयाच्या लोककला विभागातर्फे आयोजित शाहिरी प्रशिक्षण शिबिराच्या नवव्या दिवशी ते ‌‘शाहिरीतून समाजप्रबोधन‌’ या विषयावर बोलत होते. यावेळी अंबी यांनी शाहिरी कलेचे मर्म उलगडून सांगतानाच विद्यार्थ्यांना समाजसुधारणेचा कानमंत्र दिला.

आपल्या मार्गदर्शनात शाहीर अंबी यांनी व्यसनमुक्ती, स्त्री भ्रूणहत्या, अंधश्रद्धा निर्मूलन आणि निसर्ग संवर्धन यांसारख्या ज्वलंत सामाजिक विषयांवर प्रकाश टाकला. केवळ भाषणच नाही, तर या विषयांवर प्रत्यक्ष शाहिरी सादरीकरण करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. दुपारच्या सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांकडून शाहिरी गायनाचा सराव करून घेतला. यात शब्दांची फेक, आवाजातील चढ-उतार आणि चेहऱ्यावरील हावभाव यांचा मेळ कसा साधावा, याचे प्रात्यक्षिक दिले.

शाहिरी ही परिवर्तनाची चळवळ

“शाहिरी ही परिवर्तनाची चळवळ आहे. त्यामुळे शाहिराच्या शब्दांत अन्यायाविरुद्ध लढण्याची धार असावी, पण त्याचवेळी त्यात माणुसकी आणि संवेदनशीलताही जपली जावी,” असे मत त्यांनी व्यक्त केले. शिबिराच्या या दिवसाचा समारोप प्रा. कल्याण उगले यांनी आभार मानून केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT