School of Khadki students in CEO's hall
भारत सवने
परतूर : परतूर तालुक्यातील खडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या पंधरा दिवसांपासून एकही शिक्षक उपलब्ध नसल्याने सोमवार (६) रोजी चिमुकल्यांनी चक्क जिल्हा परिषदेतील मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरवली. यावेळी शिक्षक द्या, शिक्षक द्या अशा घोषणाही चिमुकल्यांनी दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षक देण्याचे सांगितल्यानंतर चिमुकल्यांनी आंदोलन मागे घेतले.
परतूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या पंधरा दिवसांपासून एकही शिक्षक उपलब्ध नसल्याने संतप्त पालकांसह विद्यार्थ्यांनी सोमवारी जालना येथील जिल्हा परिषद कार्यालयावर धडक देत शिक्षकांच्या मागणी करीत विद्यार्थी आणि पालकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता. चिमुकल्यांच्या या आंदोलनाची तातडीने दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम मिनु यांनी शाळेवर तत्काळ दोन शिक्षक देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी खडकी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीसाठी २८ विद्यार्थी आहेत. दोन्ही शिक्षकांच्या बदल्या झाल्याने शाळेत एकही शिक्षक नाही. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विनंती आहे की, त्यांनी शाळेत पालकांच्या तीव्र भावना आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खडकी शाळेवर तातडीने दोन शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकांना दिले.
जिल्हा परिषद प्रा.शा. खडकी शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून पटसंख्या २८ आहे. या शाळेवर दोन शिक्षक कार्यरत होते, परंतु पंधरा दिवसांपूर्वी त्यांची बदली झाल्याने शाळा शिक्षकविरहित झाली आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णपणे थांबल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक भविष्याचे मोठे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळावा यासाठी आंदोलन करावे लागत आहे.