

Fruit crops damaged due to continuous rains in Jafrabad taluka
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात सततच्या पावसाने इतर पिकांसह फळ पिकांचही मोठं नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त फळबागांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मांगणी अॅग्रोव्हिजन गटशेती संघांचे संस्थापक प्रमुख संजय मोरे यांनी केली आहे.
तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले, की यावर्षी मे महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यांपर्यंत सतत पाऊस सुरू होता. त्यामुळे या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने आंबा पिकाला ताण बसला नाही. त्यामुळे अद्याप पर्यंत आंब्याला मोहराची काडी तयार झाली नाही. लिंबू पिकाला ताण बसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे तेही उत्पन्न बुडाले आहे. पेरू पिकाचीही तीच अवस्था आहे. सततच्या पावसाने आवळा पिकाचा मोहोर झडल्याने त्याला अल्पप्रमाणात फळे लागली आहेत.
सीताफळ या फळपिकाची कठीण अवस्था झाली आहे. फुले लागली नाहीत. जी लागली ती टिकली नाहीत. जी टिकली ती बुरशीने काळी पडून गळून गेली. त्यातही थोडेफार आलेली फळे झाडावरच पिकून खाली गळून पडली. राहिलेली फळे झाडावरच तडकली. यामुळे फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.