Samajbhan celebrates Diwali with underprivileged families from thirteen villages
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा: दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश, प्रेम आणि एकोपा यांचा सण. परंतु समाजातील काही कुटुंबांसाठी ही दिवाळी फक्त आठवणींची, काळ-रेखाची आणि जगण्यासाठीच्या संघर्षाची ठरते. अशा हज-ारो वंचित, निराधार आणि अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या आयुष्यात गेली दहा वर्ष 'समाजभान' टीमने खऱ्या अर्थाने प्रकाशाचा दिवा लावला आहे.
या वर्षदिखील समाजभान टीमने 'वंचितांची दिवाळी समाजभानसोबत' या भावनिक उपक्रमांतर्गत तेरा गावांतील शेकडो कुटुंबांची दिवाळी साजरी केली. या उपक्रमामुळे अनेकांच्या ओसाड घरांमध्ये पुन्हा एकदा हास्य उमटलं, मुलांच्या चेहऱ्यांवर उजेड आला आणि वृद्धांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू चमकले.
१९ ऑक्टोबर रोजी अंबड शहरातील इंदिरानगर भागात या उपक्रमाचा पहिला दिवा प्रज्वलित करण्यात आला. त्या ठिकाणी सत्तरहून अधिक कुटुंबांना फराळाचे साहित्य, दिवे-पणत्या, सुगंधी तेल, साबण, साडी, ब्लॅकेट, चटई आदी वस्तू देऊन दिवाळी साजरी करण्यात आली. एका वृद्ध आजीबाईंनी त्या वेळी भावुक होत म्हटलं, "माझ्या घरात गेल्या पाच वर्षांपासून दिवाळीच नव्हती, आज तुम्ही आणलीत." तो क्षण समाजभानच्या प्रत्येक सदस्यासाठी अमूल्य होता.
दुसऱ्या टप्प्यात २० ऑक्टोबर रोजी समाजभान टीम अंबड-घनसावंगी तालुक्यातील बांधलापुरी, मोहपूरी, बोलेगाव, घनसावंगी, मुंगू मजळगाव, तनवाडी, राजेगाव, माहेरजवळा, बोररांजणी, तिर्थपूरी, मच्छिंद्रनाथ चिंचोली, बाचेगाव, भायगाव या तेरा गावांमध्ये पोहोचली. येथे अतिवृष्टीत पिके व घरे उद्ध्वस्त झालेल्या तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना केवळ फराळच नव्हे तर प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
या मोहिमेत समाजभान टीमचे सदस्य दररोज पहाटेपासून रात्रीपर्यंत गावोगावी फिरत होते. त्यांनी भंगार गोळा करणारे, रेल्वे स्थानकावर झोपणारे, रस्त्यावर भिक्षा मागणारे, घुंगरू वस्तीतील महिला, उंटवाले, आणि पावसात घर उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब यांच्यापर्यंत पोहोचून "तुम्ही एकटे नाही" हा आश्वासक संदेश दिला. यावेळी समाजभानचे पदाधिकारी उपस्थित होते.
मदतीचा हात
या संपूर्ण मोहिमेदरम्यान समाजभान टीमने कोणतीही प्रसिद्धी न करता, कोणत्याही राजकीय पाठिंब्याशिवाय केवळ मानवतेच्या भावनेतून हे कार्य पार पाडले. गेली दहा वर्षे सातत्याने दिवाळीच्या काळात दोन हजारांहून अधिक कुटुंबांना मदतीचा हात देऊन समाजभान टीमने संवेद-नशीलतेचा एक अद्वितीय आदर्श निर्माण केला आहे.