Rivers flood in Ghansawangi taluka, rain disrupts normal life
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने खरिपातील कापूस, सोयाबीनसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जास्तीच्या पावसाने शेताला तळ्याच्या स्वरूप आले आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे पाण्यात गेली आहेत.
धो-धो पडणाऱ्या पावसाने नारोळा, खडकी, मुसा भद्रायनी नद्यांना पूर आले आहेत. अनेक ठिकाणी पुराचे पाणी पुलावरुन वाहात असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सततच्या मुसळधार पावसाने तालुक्यातील सर्व लघु प्रकल्प तसेच तलाव तुडुंब भरले आहेत.
घनसावंगी तालुक्यात मुसळधार पावसाचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान होउन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपाने हिरावला जाणार आहे. पोळा सण चार दिवसावर आला असतानाच वरुण राजाने बळीराजाची चिंता वाढवली आहे.
घनसावंगी तालुक्यात खरीप हंगामात सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रविवारी मध्यरात्रीच्याच सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे ऐन बहरात आ-लेले कापूस, सोयाबीनसह इतर खरीपाची पीके पूर्णपणे पाण्यात गेली आहेत.
पावसाचा जोर जास्त असल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. नारोळा, खडकी, मुसा भद्रायनी नद्यासह ओढे व नाले भरून वाहात आहेत. पाण्याचा जोर जास्त असल्याने अनेक ठिकाणी नदी, ओढे व नाल्याचे पाणी शेतात वेगाने शिरल्याने पिके आडवी झाली आहेत.