Response to the bandh in support of Manoj Jarange in the district
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरासह जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गुरुवारी पुकारण्यात आलेला बंद मागण्या मान्य झाल्याने स्थगीत करण्यात आला होता. मात्र तरीही जालना शहरातील नवीन मोंढ्यासह अनेक भागात बंद पाळला गेला.
जालना शहरासह जिल्ह्यातील आठही तालुक्यांत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गुरुवारी जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. बंद व रस्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टेन्शन वाढले होते. मात्र बुधवारी रात्री उशीरा आ. प्रसाद लाड यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेउन त्यांच्या समोर सादर केलेल्या मसुद्यात बहुसंख्य मागण्या मान्य करण्यात आल्याने जरांगे यांनी आ. लाड यांच्या हस्ते पाणी पिऊन वैद्यकिय उपचार घेण्यास मान्यता दिली.
त्यामुळे जरांगे यांच्या आमरण उपोषणामुळे गेले पाच दिवस असलेले तणावाचे वातावरण काहीसे निवळले. तत्पुर्वीच मराठा समाज बांधवानी गुरुवारी जालना जिल्हा बंदची हाक दिली होती. त्यानंतर रात्री उशीरा मनोज जरांगे पाटील याचे समर्थक प्रशांत वाढेकर यांनी बंद व रस्ता रोको मागण्या मान्य झाल्याने स्थगीत केल्याची व्हिडीओ क्लीप व्हायरल केली होती.
त्यानंतरही नियोजीत बंदला जालना आडतिया असोसिएशननने पाठींबा दिला असल्याने नवीन मोंढ्यात बंदच्या पार्श्वभूमीवर शुकशुकाट दिसून आला. बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यावसायिकांनी नवीन व जुना जालन्यातील दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवल्याचेही पहावयास मिळाले. बंदमुळे बाहेरगावाहून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाल्याने बसस्थानकात वर्दळ कमी होती.
तळणी येथे कडकडीत बंद
तळणी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पुकारलेल्या बंदला मंठा तालुक्यातील तळणी येथे मोठा प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला. जालना जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर तळणी येथील सकल मराठा समाज आणि व्यापारी महासंघाच्यावतीने तळणी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत येथील सर्व लहान-मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने पूर्णवेळ बंद ठेवली. 'एकच मागणी - मराठा आरक्षण' आणि 'मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं' या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. हा बंद अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडला.
मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी व्यापारी महासंघ तळणी आणि सकल मराठा समाज तळणी यांच्यासह ग्रामस्थ, तरुण वर्ग आणि सर्व व्यवसायिकांनी या बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
चोख बंदोबस्त
बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील चौका-चौकात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे दिसुन आले. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यावरील वाहतूकही नेहमीपेक्षा कमी असल्याचे पहावयास मिळाले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळला गेला. बंद दरम्याने अनेक रस्ते ओस पडल्याचे दिसून आल्याचे निदर्शनास आले.