

Two acres of sugarcane on fire
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील वडीगोद्री शिवारातील गट क्रमांक १० येथे महावितरणच्या विद्युत वाहिनीतील बिघाडामुळे लागलेल्या आगीत शेतकरी बापूराव दादाराव काळे यांचा व त्यांच्या भावांचा एकूण सात एकर ऊस पिकापैकी तब्बल दोन एकर ऊस जळून खाक झाला. यात दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरूवारी (दि.३) रोजी घडली आहे. या घटनेत अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतातील ऊस पिका जवळून गेलेल्या जीर्ण झालेली विद्युत तार तुटल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. पाहता पाहता आगीने उग्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाला वाढत असल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकरी व नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी उपस्थित नागरिकांनी प्रयत्नांची शर्थ केली.
मात्र, आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन वाहनास पाचारण करण्यात आले. अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. त्यामुळे उर्वरित ऊस आगीपासून वाचविण्यात यश आले.
मात्र, तोपर्यंत दोन एकरां वरील ऊस पूर्णपणे जळून खाक झाला होता. वर्षभर मेहनत, खर्च आणि कष्ट करून उभे केलेले पीक आगीत नष्ट झाल्याने शेतकरी बापूराव काळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईची मागणी महावितरणच्या विद्युत वाहिन्यांची नियमित देखभाल व दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
घटनेची चौकशी करा
महावितरणने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा, घटनेची चौकशी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यास योग्य ती नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतशिवारातून जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांची तातडीने तपासणी करून धोकादायक व जीर्ण झालेल्या तारांची दुरुस्ती करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.