भोकरदन : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत असताना बँकांकडून पीक कर्ज वाटपात होत असलेल्या दिरंगाईबाबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा भोकरदन येथे भेट देऊन व्यवस्थापक प्रशांत वाघ यांची भेट घेतली.
यावेळी तुपकर यांनी शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज वाटप करण्याची ठाम मागणी केली. सध्या खरीप हंगाम वाया गेला असून रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज आहे. बँकेने कागदपत्रांच्या नावाखाली शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावू नये, तत्काळ कर्ज मंजूर करावे, अशा सूचना त्यांनी व्यवस्थापकांना दिल्या.
शेतकरी आधीच दुष्काळाने हवालदिल झाला आहे, त्यात बँकेने सहकार्य न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. व्यवस्थापकांनी येत्या काही दिवसात प्रलंबित असलेले सर्व पीक कर्ज प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
तसेच तांत्रिक अडचणींमुळे होणारा विलंब लवकरच दूर करणार असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
रविकांत तुपकर यांनी यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक केदार यांच्याशी फोनवरून चर्चा करून सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांना तत्काळ प्रलंबित कर्ज प्रकरणे मंजूर करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच बॅंकानी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास शेतकर्यांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी दिला.