Raksha Bandhan Rakhi market decorated in Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवा बहीण भावाचे अतुट नाते अधिक वृद्धिंगत करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा हा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने या सणानिमित्त बाजारात डायमंड, स्टोन, मोती राखी यासह विविध प्रकारच्या रंगीबेरंगी राख्यांनी बाजार फुलला आहे. यावर्षी अनेक नवे ट्रेंड राख्यांमध्ये पाहायला मिळत आहेत.
शहरातील विविध भागात आकर्षक अशा राख्यांनी दुकाने सजली आहे. हॅण्डमेड राख्यांना पसंती कायम असून गेल्या काही वर्षांपासून हिट ठरलेली ब्रेसलेट राखीची क्रेझ यंदाही कायम असल्याचे चित्र आहे. दृष्ट प्रवृत्तीपासून भाऊरायांचे संरक्षण व्हावे, यामागील धारणा असलेल्या नजररक्षक कवच राखीने साऱ्याचे लक्ष वेधले आहे. यासह रुद्राक्ष, डायमंड, मोती, ओंकार राखी बाजारात दाखल झाले आहे.
यंदा चांदीसह ऑक्सिडाइज्ड तसेच तांब्याच्या राख्याही बाजारात दाखल झाल्या आहेत. सिंदूर राखी बाजारात दाखल झाल्याचे दिसत आहे. बाजारपेठेमध्ये अनेक अशा ट्रेंडी राख्यादेखील आलेल्या आहेत. महिला, मुली मोठ्या संख्येने लाडक्या भाऊरायासाठी राखी खरेदीसाठी विविध स्टॉलवर गर्दी करताना दिसत आहेत.
या वर्षी राख्यांच्या किमतीत काहीशी वाढ झाली आहे. आगामी दोन दिवस राख्या खरेदीसाठी महिला व मुलींची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. राखीच्या व्यवसायातून अनेक व्यावसायिकांना चांगली कमाई होत असल्याने शहरातील विविध भागांत व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
या राख्यांची मागणी
जालना शहरात महाकाल, श्रीराम, छोटा भीम, स्पायडरमॅन या राख्या बच्चे कंपनीसाठी आकर्षण ठरत आहेत. पारंपरिक गोंडा राखीलाही मागणी असल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या जोरदार पाऊस नसल्याने खरेदीचा जोर आहे.