

Goods worth two lakhs seized from 'those' thieves
भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन शहरात पकडण्यात आलेल्या तीन आरोपींकडुन भोकरदन पोलिसांनी २ लाख १३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.या चोरट्यांकडून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
भोकरदन शहरात पोलिस उपनिरीक्षक पवन राजपुत व पोलिस अंमलदार शिवाजी जाधव हे पेट्रोलिग करत असताना त्यांना बसस्टॅण्ड मधून एका प्रवाशाचे पाकीट तीन चोरट्यांनी चोरुन चोरटे हे रिक्षाने सिल्लोडकडे पळून जात असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. सदरची माहीती प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक माने सहायक यांना तत्काळ देऊन पोलिसांनी पथक तयार करुन आरोपीचा शोध घेणे सुरू केले.
त्यांना संशयित अॅपेरिक्षा हि सिल्लोड रोडने जात असल्याची माहीती मिळाल्याने अॅपेरिक्षा थांबविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र रिक्षाचालकाने रिक्षा न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी पाठलाग सुरु केला. सदरची कामगिरी प्रभारी अधिकारी संतोष माने, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पवन राजपूत, विकास जाधव, शिवाजी जाधव यांनी केली.
भोकरदन शहरातील म्हाडा रोडवरील कच्चा रस्त्यावर शेतात अॅपेरिक्षा सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सय्यद इरफान सय्यद उस्मान, आकाश छोटू परदेशी, सय्यद सोहेल सय्यद आलम यांना पोलिसांनी जेरबंद केले. रिक्षाचालक रिजवान शेख मोमद्यीया शेख हा फरार झाला. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून २लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.