

Stray dogs will be caught and sterilized.
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. एका बालीकेचा कुत्र्यांमुळे जीव गेल्यानंतरही कुत्र्यांवर कारवाई होत नसल्याने दहशत कायम आहे. दरम्यान महापालीकेच्यावतीने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम राबविण्यात येणार असुन त्या करीता कुत्रे पकडण्याचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले आहे. निर्बीजीकरणानंतर कुत्र्यांची दहशत संपणार का हा प्रश्न आहे.
शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या सहा हजरावर आहे. या कुत्र्यांनी गल्लोगल्ली हैदोस घातला आहे. कुत्र्यांच्या झुंडी सकाळी व रात्री रस्त्यावर उतरत असल्याने दुचाकीधारक, पादचाऱ्यांच्या मनात धडकी भरत आहे. दिवसाही छोट्या बालकांचे कुत्रे लचके तोडत आहेत. एका बालकाला कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्याला साठ टाके द्यावे लागले होते.
एका बालिकेचा कुत्र्यांनी जीव घेतला. मंगळवारीही एका बालीकेच्या गालाचा कुत्र्यांनी चावा घेतला. या प्रकारामुळे कुत्र्यांची दहशत केव्हा संपणार? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महानगरपालिकेने मोकाट कुत्रे पकडण्यासाठी एका एजन्सीला टेंडर दिले आहे. मोकाट कुत्रे ठेवण्यासाठी शहरातील अग्निशमन केंद्राजवळ शेड उभारण्यात आले आहे. या शेडमध्ये मोकाट कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचे झुंडी रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. हे कुत्रे रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्यांवर हल्ले करून चावा घेतात.
त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मोकाट कुत्रे पकडून त्यांना ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडून अग्निशमन केंद्राजवळ शेडची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच संबंधीत एजन्सीकडून कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू होण्याची शक्यता असून या मोहिमेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मोकाट जनावरांचा प्रश्नही शहरात ऐरणीवर असून त्यासाठी कोंडवाड्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात सात दिवस ठेवण्यात येणार आहे. जनावरे घेण्यासाठी आलेल्या मालकांकडून दररोज दंड वसुल केला जाणार आहे.