Rajesh Tope Declaring a wet drought in the district
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी मतदारसंघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी माजी मंत्री राजेश टोपे यांनी केली. या संदर्भात मंगळवार दि. ३० रोजी मंत्रालय येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी मंत्री टोपे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी राजेश टोपे म्हणाले की, जालना जिल्ह्यासह अंबड व घनसावंगी तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस व अतिवृष्टी झाल्याने शेतामध्ये उभी असलेली कापूस, तूर, सोयाबीन, मूग, उडीद या खरीप पिकांमध्ये गुडघ्याइतके पाणी साचल्याने संपूर्णपणे नुकसान झालेले आहे.
तसेच पालेभाज्यांसह सर्व फळबागांचे व उसाचेसुध्दा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे तसेच काही ठिकाणी पाझर तलाव फुटल्याने जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून व वाहून गेलेल्या आहेत. घरांचीही पडझड झाली आहे.
अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. गोदा वरी नदीला पूर आल्याने जिल्ह्यातील अंबड-घनसावंगी व परतूर तालुक्यातील गोदातिरावरील गाव- वस्त्यांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात सार्वजनिक व वैयक्तिक हानी झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून त्याअनुषंगाने वीजबिल वसुली, कर्ज वसुली करू नये, शैक्षणिक शुल्क माफ करावे.
या अनुषंगाने दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करण्यात याव्यात. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या सर्व नुकसानीचे सरसकट पंचनामे तातडीने करण्यात यावेत व शासन निर्णयाप्रमाणे तत्काळ जिरायती, बागायती फळबाग, पशुधन, शेतीचे, घरांचे झालेल्या हानीची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी निवेदनाद्वारे राजेश टोपे यांनी मागणी केली आहे.