

62 thousand hectares of area affected in Bhokardan taluka
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले असून, तब्बल ६२ हजार ६८२ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले आहेत. महसूल प्रशासनाने पहाणी केली. मात्र नुकसान भरपाई कधी मिळणार असा सवाल शेतकऱ्यातून उपस्थित होत आहे.
मागील आठवड्यात जोरदार पावसाने पिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. भोकरदन तालुक्यातील १५७गावांमध्ये १ लाख ८ हजार ७४ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड करण्यात आली होती. मात्र पावसाच्या तडाख्याने अनेकांचे पिके हातात येण्याआधीच मातीमध्ये मिळाले आहे.
यामध्ये मका, सोयाबीन, कापूस आणि मिरची पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पिके काढणीचा हंगाम सुरू असून मजुरांचेही दर वाढल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.
यंदा विशेषतः मिरची उत्पादकांना सुरुवातीला चांगला दर मिळत होताः परंतू पावसामुळे हे पीकही वाया गेले आहे. मात्र प्रत्यक्ष आर्थिक मदतीसाठी आद्याप कोणीही पुढे आलेले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे.