Rain crisis hits the district again, farmers panic, farm produce hit
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात २४ व २५ ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पऊस पडला. दरम्यान २६ ते २८ ऑक्टोबरला पुन्हा हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकरी धास्तावले आहेत. शेतात काढून ठेव-लेले सोयाबीन, मका व वेचणीस आलेल्या कपाशीला या पावसाचा फटका बसत आहे.
जालना जिल्ह्यात ऑगस्टपासून पडत असलेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून अनेक वर्षांनंतर नद्याही वाहताना दिसत आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरीही शेतातील पाणी हटत नसल्याने खरिपातील सोयाबीन, मका व कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. एकीकडे मजुरीचे दर गगनाला भिडले असतानाच दुसरीकडे शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी हतबल झालेले असतानाच दुसरीकडे जे पीक हाती लागले त्यावर पावसाचे संकट घोंगावत आहे.
अनुदानाची प्रतीक्षा
अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे अनुदान शासनाकडून जाहीर झाले असले तरी दिवाळी संपूनही ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने शेतकरी अनुदानाच्या मदतीकडे डोळे लावून असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.