

Three-storey building collapses in Ambad city, three injured, rickshaw damaged
अंबड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नाभ्रेकर चौकात तीन मजली जुनी इमारत शनिवार (२५) रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कोसळली. या घटनेत एका रिक्षाचे नुकसान झाले असून तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. कोसळलेल्या बिल्डिंगच्या लगत असलेली जुनी एक मजली इमारत, एक किराणा गोडाऊन तसेच एका दुकानाचे या घटनेत किरकोळ नुकसान झाले आहे.
जुन्या अंबड शहरातील नाथ्रेकर चौकात १९५४ ते१९५५ दरम्यान बांधकाम केलेल्या अनेक जुन्या इमारती असून त्या मोडकळीस व जीर्ण झाल्या आहेत. या इमारतीकडे इमारत मालकाचे व नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अंबड नगर परिषदेने जीर्ण झालेल्या काही घरमालकांना नोटिसा दिल्या आहेत. यशोदाबाई मदन मोटकर यांच्या पडलेल्या या इमारतीमुळे या इमारती खाली उभा असलेला रिक्षा (क्र. एम एच २० ए एक ५७७४) रिक्षाचे नुकसान झाले.
या घटनेत तिघाजणांना किरकोळ मार लागला. या इमारती शेजारीच असलेल्या माणिकचंद पाटणी यांच्या किराणा गोदामावर मलबा पडून किराणा मालाचे नुकसान झाले. मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांनी स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे, परमेश्वर शिंदे, तांत्रिक सल्लागार बळवंत लंके, भारत जाधव यांच्यासह जेसीबी व दोन ट्रॅक्टरसह घटनास्थळी भेट देऊन मलबा उचलण्यास सांगितले.
मोडकळीस आलेल्या इमारत मालकांना इमारती काढून घेण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान यावेळी माजी उपनगराध्यक्ष जाकेर डावरगावकर, माजी उपनगराध्यक्ष केदार कुलकर्णी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक ठाकूर, नगरसेवक फेरोज शेख, संदीप खरात, बबनराव बुंदेलखंडे आदींची उपस्थिती होती. या प्रकरणी इमारत मालकावर गुन्हा दाखल केला.