Raid on gambling den in Nidhona Shivara
जालना, पुढारी वृत्तसेवा : बदनपूर तालुकयातील निधोना शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर चंदनझिरा पोलिसांनी धाड टाकून १४ जुगाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहनांसह तब्बल २५ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या पथकासह चंदनझिरा पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निधोना शिवारात काही जण एकत्र येऊन लपूनछपून इन्ना-मन्ना व तीन पत्ती नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.. या जुगारामध्ये मोठ्या पैशांची देवाणघेवाण होत असल्याचीही माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक किरण बिडवे व सहायक पोलिस निरीक्षक अविनाश गडाख यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली.
मंगळवारी (दि.१६) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान चौदा जणांना पकडण्यात आले. चंदनझिरा पोलसांच्या कारवाईमुळे ग्रामीण भागातील जुगाराचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे दिसत आहे.
गुन्हा दाखल
ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहने जप्त करण्यात आली. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जोहरसिंग कलाणी करीत आहेत.