Pomegranate fetches a price of 14,000 during Ganeshotsav
जालना, पुढारी वृत्तसंस्था : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण डाळिंबाला २८०० रुपये कॅरेट म्हणजेच १४ हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे.
दरम्यान, जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गत दोन दिवसापूर्वी २०० ते २५० कॅरेटची डाळिंबाची आवक झाली होती. या डाळिंबाचा दर्जा कमी होता. यामुळे या डाळिंबाची विक्री सरासरी शंभर ते दीडशे रुपये कॅरेट प्रमाणे झाली.
गणेशोत्सवात फळांना चांगली मागणी असल्यामुळे आवक तर वाढली होती. मात्र दर्जा चांगला राखता आला नव्हता. त्यामुळे या डाळिंबाला भाव चांगला मिळाला नाही. सरासरी मागच्या आठवड्यात देखील जिल्हाभरातील स्थानिक शेतकऱ्यांकडून बाजार समितीत डाळिंबाची विक्री करण्यात येत आहे. सरासरी २०० ते ३०० कॅरेट दररोज मार्केट कमिटीत आवक येत आहे. गुरुवार, दि. २८ रोजी एका कॅरेटला २८०० रुपये इतका भाव मिळाला. हा भाव सुमारे १४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका आहे. हंगामात डाळिंबाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे बाजारपेठेत डाळिंबाची मागणी वाढली आहे.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाची आवक रोज ४ ते ६ टनापर्यंत राहिली. गेल्या काही महिन्यांपासून डाळिंबाच्या आवकेत सातत्याने चढ-उतार होतो आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाची आवक तुलनेने कमी राहिली, पण मागणीत सातत्य राहिल्याने डाळिंबाचे दर पुन्हा एकदा वधारल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाची आवक रोज एक ते दोन टनापर्यंत राहिली. गेल्या काही महिन्यांपासून डाळिंबाच्या आवकेत सातत्याने चढ-उतार होतो आहे. पण मागणीच्या प्रमाणात आवक नसल्याने डाळिंबाला चांगला उठाव मिळाला आणि दरही वाढले. या सप्ताहातही पुन्हा तशीच स्थिती राहिली.
डाळिंबाची आवक परतूर, घनसावंगी, जालना आदीसह या स्थानिक भागातून झाली. चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला प्रति (क्रेट) २८०० रुपये भाव मिळत आहे. मात्र असे असले तरी बदलते हवामान व उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पादन मिळत नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
बदलते हवामान व अत्यल्प पावसामुळे डाळिंबावर तेल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. उत्पादनात घट मात्र मागणी वाढल्याने डाळिंबाची लाली आणखीच खुलली आहे. चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला प्रति किलोला किरकोळ बाजारात १८० ते २०० रुपयांचा भाव मिळत आहे. मात्र डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना चढ्या भावाचा काहीच फायदा होताना दिसत नाही. डाळिंब उत्पादकांनी पाणी विकत घेऊन डाळींब बागा जगवल्या. बदलत्या हवामानामुळे महागड्या औषध फवारणी करावी लागली मात्र तेल्या व मर रोगाने डाळिंब उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पादन मिळत नसल्याने भाव वाढूनही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याने शेतकऱ्यांत मात्र निराशा आहे.
एकंदरीत डाळिंबाची आवक घटत राहिली डाळिंबाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच, डाळिंबाला सध्या मिळत असलेल्या वाढीव दरामुळे ग्राहकाला जरी डाळिंब महाग वाटत असले तरी शेतकऱ्यांना मात्र डाळिंब उत्पादनाचा खर्च वाढीव असल्याने भाव वाढूनही फायदा होताना दिसत नाही. दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढत आहे.