

Shopping rush for Gaurai festival
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा :
विघ्नहर्त्या गणरायाबरोबरच आता गौरी महालक्ष्मीच्या आगमनास अवघे काही दिवसच शिल्लक असताना गौरीचे मुखवटे व पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. एक ते पाच हजारांपर्यंत गौरीचे आकर्षक असे मुखवटे उपलब्ध आहे. हे मुखवटे सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.
गौरी गणपतीचा सण जवळ आला की गृहिणींची विविध वस्तूंच्या खरेदीसाठी लगबग सुरू होते. यंदा गौरीसाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. गौरीसाठी असलेल्या पत्र्यांच्या कोठ्यांची जागा स्टॅण्डने घेतली असून गौरीला सजवण्यासाठी बाजारात खास कोल्हापुरी साज उपलब्ध झाले आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या गौरीच्या सणाला मोठे महत्त्व आहे. प्रत्येक घरात भाद्रपद महिन्यामध्ये गौरीचे आगमन होते. ज्यांच्या घरात नवीन सून आली आहे ते कुटुंब गौरीसाठी लागणारे सर्व साहित्य पुन्हा नव्याने खरेदी करत असते. गौरीचे मुखवटे, गौरीचे दागिने, गौरी बसवण्यसाठीचा स्टॅण्ड या सर्व साहित्याची बाजारपेठेत जोरदार खरेदी सुरू आहे. शहरात गौरीसाठी अनेक दुकाने सजली आहेत.
आपापल्या आवडीनुसार लोक गौरीसाठी दागिने खरेदी करत असतात साड्यांप्रमाणेच गौरीच्या शृंगारासाठी दागिन्यांची नवलाई बाज-ारात पाहावयास मिळत आहेत. दागिन्यांमध्ये मोहनमाळ, ठुशी, बोरमाळ, लक्ष्मीहार, चपला हार, मोत्याचे सर, बाजूबंद, कानातील झुबे, वेल, पूर्ण कानवेल, मंगळसूत्र, विविध आकारांच्या नथी, वेण्या आदी पारंपरिक पद्धतीच्या दागिने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर ऑक्सिडाईज रंगाच्या दागिन्यांचीही महिलांमध्ये क्रेज दिसून येत आहे.
पूर्वी लोखंडी पत्र्याच्या कोठीवर साडी नेसवून गौरीची प्रतिष्ठापना केली जात असे. लोखंडी कोठ्यांची जागा स्टॅण्डने घेतली आहे. लोखंडी पट्ट्यांचे हे स्टॅण्ड पर्याय म्हणून बाजारपेठेत दाखल झाले आहेत. ५०० ते २०००रुपये किमतीला हे स्टॅण्ड बाजारपेठेत उपलब्ध आहेत.