Police seize gutkha worth ₹1.25 crore at Rajur
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतूक व विक्रीविरोधात जालना पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईत पोलिस अधीक्षक तेघबीरसिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षकांच्या पथकाने भोकरदन तालुक्यतील राजुर येथे केलेल्या कारवाईत १ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९५ लाख रुपये किमतीचा गुटखा तसेच ४० लाख रुपये किमतीची वाहने, असा १ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. या प्रकरणी एका जणावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात सदर गुटख्याचा पुरवठा करणारा इसम हा मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुर येथील असल्याचे समोर आले आहे.
गुटखा प्रकरणात पकडलेला आरोपी वॉन्टेड असुन तो यापूर्वीही जालना पोलिसांच्या कारवाईतून फरार झाला होता. त्याच्याविरुद्ध बदनापूर व हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा तसेच इतर विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक तेघबीरसिंग संधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांच्या पथकातील सपोनि अविनाश गडाख, सफौ दिनेश बर्डे, जमादार सचिन कोकणे, मपोशि मेघा बोराडे, चापोशि/नंदकिशोर जैवाळ, जमादार हरबक, पोलिस कर्मचारी नागवे, रांजणे, जैवाळ यांनी केली-
कडक कारवाई सुरूच राहणार
जालना जिल्ह्यात अवैध गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक, विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू असून, अशा अवैध व्यवसायात सहभागी असणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे.