Police apprehended the murder accused by disguising themselves as Warkaris
परतूर, पुढारी वृत्तसेवा : परतूर पोलिसांनी खून, दरोडा व जीवघेणा हल्ला प्रकरणातील एका फरार कुख्यात मुख्य आरोपीस वारकऱ्यांचा वेश धारण करून शिताफीने अटक केली.
परतूर पोलिस ठाणे हद्दीत २ जून रोजी एका व्यापाऱ्यावर चार अज्ञात इसमांनी जीवघेणा हल्ला करून रोख रक्कम लुटल्याची गंभीर घटना घडली होती. या प्रकरणी प्रवीण कांतीलाल होलाणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आधी या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, या गुन्ह्यातील फरार असलेला मुख्य आरोपी खोबऱ्या शिवाजी काळे हा पंढरपूरकडे जाणाऱ्या माऊलींच्या दिंडीमध्ये असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती परतूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांना मिळाली. मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, जमादार जाधव, पोलिस कर्मचारी खाडे, राम हाडे, चव्हाण यांच्यासह अंमलदारांचे एक विशेष पथक तातडीने रवाना करण्यात आले.
सदर पथकाने माऊलींच्या दिंडीत माळशिरस येथे मुक्कामात असताना, कोणतीही शंका येऊ नये म्हणून वारकऱ्यांचा वेश धारण करून आरोपी खोबऱ्या शिवाजी काळे याचा शोध घेतला आणि त्यास शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने सदर जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच, घनसावंगी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तो मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने सदर खून आपल्या साथीदारांसह रांजणी शिवारामध्ये केल्याची कबुली दिली आहे.