पिंपळगाव रेणुकाई : येथील आठवडी बाजारात विक्रीस आलेली जनावरे. pudhari photo
जालना

Bullock market price drop : पिंपळगाव रेणुकाईच्या बाजारात बैलजोडीच्या दरात मोठी घसरण

लाख रुपयांची बैलजोडी केवळ 70 हजारांत विक्रीस

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईचा मंगळवारी भरणारा आठवडे बाजार जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, यंदा या बाजारात वेगळेच चित्र दिसत आहे. जनावरांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने बाजारात प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे दर कोसळले. लाख रुपयांपर्यंत किंमत असलेली बैलजोडी केवळ 70 हजार रुपयांत विक्रीस निघाल्याने पशुपालक हवालदिल झाले.

खरीप हंगाम संपला. रब्बी हंगामाला गती नाही. शेतात काम नाही. त्यामुळे बैलजोडीची गरज उरलेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीसाठी बाजारात आणली. पुरवठा वाढला. मागणी मात्र कमी राहिली. परिणामी दर घसरले. काही बैलजोड्या वर्षानुवर्षे वाढवलेल्या. घरातील सदस्यासारख्या जपलेल्या. त्या कमी दरात विकाव्या लागत असल्याने पशुपालक भावुक झाले. एका पशुपालकाने सांगितले, “वासरांपासून वाढवलेली बैलजोडी आहे.

उन्हा-पावसात आमच्यासोबत राबली. आज त्यांची किंमत ऐकून काळीज तुटतंय. पण परिस्थितीपुढे हतबल झालो.” बाजारात खरेदीदार भाव पाडून बोलणी करत होते. विक्रेते नाईलाजाने तेच दर स्वीकारत होते. काहींनी जनावरे परत नेली. काहींनी कर्ज फेडण्यासाठी, घरखर्च भागवण्यासाठी मन मारून विक्री केली. जनावरांच्या गळ्यात हात घालून उभे असलेले पशुपालक पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले.

या बाजारात केवळ व्यवहार होत नाहीत, तर अनेकांच्या आयुष्याचा हिशेब लागतो. बैलजोडी विकणे म्हणजे घरातील आधार गमावण्यासारखे आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. शेतमजुरी, शेतीतील अनिश्चितता, वाढता खर्च आणि आता जनावरांच्या दरातील घसरण यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. आज बाजार गर्दीने फुललेला असला, तरी त्या गर्दीआड पशुपालकांची वेदना आणि असहाय्यता दडलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT