

लासूर स्टेशन : येथील शक्करभाई मोहल्यातील मुस्ताक नजीर पठाण यांच्या घरातून सोमवारी (दि.2) दिवसा ढवळ्या ड्राव्हरमधील रोख तीन लाख साठ हजार व तीन तोळे सोन्याच्या दागिन्यांची पेटी असा एकूण सहा लाख अठरा हजार सहाशे रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
यामध्ये सोन्याच्या दागिन्याची किंमत दोन लाख 58 हजार सहाशे रुपये, तर रोख तीन लाख साठ हजार एवढी आहे. दरम्यान चोरीच्या घटनेनंतर शिल्लेगावचे पीआय चाऊससह डीवायएसपी पालवे, एलसीबी, फिंगर,डॉग स्कॉड पथकाने घटनास्थळी धाव घेऊन चोरीबद्दलची माहिती जाणून तपास सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत घटनेची फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
परंतु या गजबजलेल्या मोहल्यातील पठाण यांच्या घरातून एवढी मोठी रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांची पेटी थेट घरातून चोरी गेल्याने शंकरभाई मोहल्यात खळबळ उडाली आहे.काही दिवसांपूर्वी लासूर स्टेशन येथील एका अडत व्यापाऱ्यांच्या दुकानातूनही साडेतेरा लाख रुपयांची चोरी झालेली असून, त्यांचाही तपास अद्याप लागलेला नाही. तोच आज पुन्हा शक्करभाई मोहल्यात मोठी चोरीची घटना घडल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांसमोर आव्हान
लासूर स्टेशन येथील शक्करभाई मोहल्यात भर दिवसा चोरट्याने चोरी करून तब्बल साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. यामुळे परिसरताल नागरिक, व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या आधी सुध्दा परिसरात चोऱ्या झाल्याचे नागरिक सांगत आहे. मात्र, त्या चोरीचा तपास अद्यापही लागलेला नसल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे नागरिकात संताप आहे. भर दिवसा झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे चोरट्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे.