Phenyl applied pregnant woman stomach gel stomach burns injuries
भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी सकाळी प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाच्या हृदयाचे ठोके मोजण्याच्या वेळी जेलऐवजी परिचारिकेकडून तीव्र स्वरूपाचे फिनाईल लावण्यात आले होते. त्यामुळे त्या महिलेच्या पोटाला भाजून जखम झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र पाटील यांनी चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत केली असून या तीन तज्ञ डॉक्टरांचे विशेष पथकाने शनिवार (२८) रोजी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात येऊन प्रकरणाची चौकशी केली. जखमी झालेल्या त्या महिलेची भेट घेऊन तिच्यावर केले जाणारे उपचार व घडलेली घटना याची माहिती घेत त्या महिलेचाही जबाव पथकाने नोंदवला.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकासह वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पाठविलेल्या विशेष तपासणी पथकामध्ये स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी, डॉक्टर प्रशांत बांदल, व त्वचारोग तज्ञ डॉक्टर संतोष राऊत यांचा समावेश आहे. या तिघांनी सकाळी ११ वाजता भोकरदन ग्रामीण रुग्णालयात येऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन तपासणी केली.
या प्रकरणाची चौकशी करून याचा परिपूर्ण अहवाल हे पथक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र पाटील यांना सादर करणार आहे. त्यानंतरच या प्रकरणात कारवाई केली जाईल अशी माहिती वैद्यकीय अधीक्षकांनी दिली.