Over 13.5 lakh rupees collected in fines during railway ticket inspections
जालना, पुढारी वृत्तसेवाः दिवाळीत रेल्वेला होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सुखकर प्रवासासाठी रेल्वे विभागाच्यावतीने दोन दिवस विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात २ हजार ९१७ प्रकरणात २५ लाख ७५ हजार ९४० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत विभागातील विविध रेल्वेगाड्यांमध्ये तिकीट तपासणीची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालणे, वैध तिकीटधारक प्रवाशांचे हित जपणे तसेच सर्व प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि त्रासमुक्त प्रवास उपलब्ध करून देणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
या मोहिमेचा एक भाग म्हणून ६ नोव्हेंसबर रोजी नांदेड विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे दरम्यान विनातिकीट व अनियमित प्रवासाची १ हजार ५०२ प्रकरणे उघडकीस आली असून भाडे व दंडापोटी १३ लाख ५६ हजार ४७५ रुपयांचा दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.
विनानोंदणी सामानाची १६७ प्रकरणे समोर
६ नोव्हेंबर रोजीची ही विशेष तपासणी मोहीम मध्यरात्री १२ वाजेपासून रात्री ११.५० वाजेपर्यंत राबविण्यात आली. या मोहिमेत 31 तिकीट तपासणी कर्मचारी, 01 रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) कर्मचारी तसेच सर्व तिकीट तपासणी पथकांनी सहभाग घेतला. या दरम्यान एकूण 26 रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान विनातिकीट प्रवासाची ९१४ प्रकरणे, अनियमित प्रवासाची ४२१ प्रकरणे आणि विनानोंदणी सामानाची १६७ प्रकरणे आढळून आली.