Otherwise, vote against the ruling party in the upcoming elections: Deepak Borhade
जालना, पुढारी वृत्तसेवा
सत्ताधाऱ्यांच्या चक्रव्युव्हात आजपर्यंत फसत गेलो. धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी आपण सोळा दिवसांचे आमरण उपोषण केल्यामुळे कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत क्रांतीची ज्वाला पेटल आहे. आगामी निवडणुकांपूर्वी धनगर समाजबांधवांना एसटीचे प्रमाणपत्र न मिळाल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करा, असे आवाहन धनगर आरक्षण योध्दा दीपक बोऱ्हाडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
सोळा दिवसांच्या आमरण उपो षणानंतर उपचार घेत असलेल्या दीपक बोऱ्हाडे यांनी शनिवार (दि.४) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवप्रकाश चितळकर, प्रल्हाद नेमाणे, संतोष काळे, संतोष लव्हटे, शाम बोऱ्हाडे, निखिल वीर, गोविंद जाधव आदींची उपस्थिती होती.
दीपक बोहाडे यावेळी बोलतांना म्हणाले, आंदोलनामुळे सरकारवर दबाव निर्माण करण्यात यशस्वी झालो असून समाज आता संघर्षाच्या पवित्र्यात आहे. समाज बांधवांकडून मुंबई आंदोलनाविषयी विचारणा होत असून सध्याच मुंबईला न जाता राज्यभर आभार दौरा करून वाडी, वस्ती, तांड्यावर समाज बांधवांची चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार पुन्हा आपल्याला उपोषण करून देणार नाही असा विश्वास व्यक्त करत त्याबाबत आशावादी असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. मुंबईला एक दिवस जाऊन राज्य शासनाला चेतावणी दिली जाईल. प्रश्न न सुटल्यास दिल्लीकडे कूच करण्यासाठीसुद्धा महाराष्ट्र सोबतच राजस्थान, उत्तराखंड येथील समाजबांधव सज्ज असल्याचे दीपक बोऱ्हाडे यांनी सांगितले.
सर्टिफिकेट नाही तर मतदान नाही असा नारा आपल्या उपोषण आंदोलनात दिला असून निवडणुकांपूर्वी प्रमाणपत्र न दिल्यास आगामी निवडणुकीत अणुबॉम्ब पेक्षाही मोठे शस्त्र असलेल्या मतांचा अधिकार वापरून समाज बांधवांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नोटा किंवा अन्य कोणालाही मतदान करावे, असे आवाहन दीपक बोऱ्हाडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
आपले युद्ध मोठे असून अनेक छुपे शत्रू आहेत. आत्महत्या करून जिंकता येत नाही. संयम, धैर्य व ताकदीने लढायचं, जीवन हे अनमोल असून तुमची कुटुंब, समाजाला गरज आहे. आपली शक्ती सरकारला सरळ करण्यासाठी खर्ची घालू असे सांगून तरुण व समाजबांधवांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन दीपक बोऱ्हाडे यांनी केले.