

Lumpy killed 38 animals in seven months
जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लम्पीची लागण मोठ्या संख्येने जनावरांना होत असल्याने पशुपालक व शेतकरी त्रस्त आहेत. दरम्यान जनावरांना लम्पीची लागण होऊ नये यासाठी पशुविभागाच्यावतीने लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून लागण झालेल्या जनावरांचर तातडीने उपचार केले जात आहेत. एत्रिल २०२५ पासून आजपर्यंत १०९९ जनावरांना लम्पीची लागण झाली असून त्यात ८२७ जनावरे या आज-ारातून मुक्त झाले असून २३४ जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत. गेल्या सात महिन्यांत ३८ जनावराच्चा लम्पीमुळे बळी गेला आहे.
लम्पीमुळे बाधित झालेल्या जनावरांना १०५ अंश सेल्सिअसपर्यंत ताप येतो. जनावरांच्या नाकातून, तोंडातून, डोळ्यांतून पाणी येते, डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात. त्यामुळे दृष्टीवर देखील परिणाम जाणवतो. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. चारा खाण्याचे प्रमाण व पाणी पिण्याचे कमी होते. यामुळे दूध उत्पादनात घट येते, जनावराच्या अंगावर कडक आणि गोल आकाराच्या दहा ते पन्नास मिलिमीटर व्यासाच्या गाठी येऊन त्यावर खपल्या पडतात. खपली गळून पडल्यानंतर जवळजवळ एक महिन्यापर्यंत तो विषाणू तेथेच राहतो. हा विषाणू संक्रमण झाल्यापासून १ ते २ आठवड्यापर्यंत त्या जनावरांच्या रक्तामध्येच राहतो आणि त्यानंतर इतर भागांमध्ये संक्रमित होतो. लसिकाग्रंथीना सूज येते.
पायावर सूज येऊन काही वेळेस जनावर लंगडते. त्वचेत तसेच त्वचेखाली पायावर, पोळीवर, मानाखाली, सुज येते. त्याच्या प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम होतो. गाभण जनावरामध्ये या रोगाची लागण झाल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते. वासरू जन्मल्यास अशक्त वासरू जन्मास येते. जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून लम्पी आजाराची लागण होउन जनावरे बाधित होण्यासह मृत्युचे प्रमाण वाढले असल्याने पशुपालक व शेतकऱ्यांसाठी या आजाराची दहशत आहे. जिल्ह्यात लम्पी झालेल्या जनावरांचे लसीकरण करण्यात आल्यानंतरही काही जनावरांना लम्पी झाल्याचे समोर आले आहे. हा जनावरांमधील विषाणूजन्य त्वचा आजार आहे. याचा प्रादुर्भाव गायी, म्हशींमध्ये आढळून येतो, मात्र शेळ्यांमध्ये आढळत नाही. याची तीव्रता संकरित गायींमध्ये अधिक प्रमाणात असते. सर्व वयोगटातील जनावरांमध्ये प्रादुर्भाव आढळतो. प्रौढ जनावरांच्या तुलनेत लहान वासरांमध्ये अधिक प्रमाणात आढळ दिसतो.
जालना जिल्ह्यात एप्रिल २०२५ ते आजपर्यंत १ हजार ९९ जनावरे लम्पीमुळे बाधित झाले आहेत. त्यापैकी २३४ जनावरांवर उपचार सुरू असून ८२७ जनावरे उपचारानंतर बरे झाले आहेत. लम्पीमुळे ३८ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
तळणी, पुढारी वृत्तसेवा मंठा तालुक्यातील तळ-णीसह परिसरातील अनेक गावात गाय, बैल या जनावरांना लम्पी या आजाराने घेरले आहे. जनावरांना मोठ्या प्रमाणात लम्पीची लागण झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. तळणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात लम्पी आजारासंदर्भात कुठलीच औषधी उपलब्ध नसल्याचा आरोप पशुपालकातून होत आहे.
मंठा तालुक्यातील तळणी परिसरात जनावरांना मोठ्या संख्येने लम्पी आजाराची लागण झाली आहे. साथीच्या या आजारासंदर्भात जनावारांची प्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज असते. जनावारांना शक्ती वर्धक औषधीची गरज असते. मात्र तीच औषधी पशुचिकित्सालयात उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारी दवाखान्यात या आजारासदर्भात फक्त इंजेक्शन उपलब्ध आहे. इतर कुठलेही औषधी उपलब्ध नसल्याने खाजगी डॉक्टर शेतकऱ्यांकडून मनमानी फीस घेत आहेत. औषधीचा वेगळाच खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. तळणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात लिवर टॉनिक पावडर, जंतनाशक गोळ्या, गोचीडावर प्रतिबंध करण्यासाठीच्या औषधी मिळणे गरजेचे आहे. तळणी परिसरात या आजारावर उपचार करण्यासाठी परिसरातील गावांसह विदर्भातील डॉक्टराच्या चकरा वाढल्या आहेत. उपचार होत असले तरी शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप आहे.