Orange Palas bloom in Ghansawangi
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा: वसंत ऋतूची चाहूल लागताच निसगनि जणू नवसंजीवनी घेतली असून, ग्रामीण, डोंगराळ तसेच माळरान परिसरात केशरी रंगाच्या पळसाच्या फुलांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. शिशिराची थंडी ओसरू लागली की पानगळीने उघडी पडलेली वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवू लागते आणि वसंत ऋतूचे आगमन जाहीर होते.
'वनज्योती' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पळसाच्या झाडांवर सध्या फुलांची दाटी पाहायला मिळत आहे. पानांशिवाय फुलणारा हा वृक्ष वसंत ऋतूच्या आगमनाची स्पष्ट जाणीव करून देतो. शेतांच्या बांधावर, रस्त्यांच्या कडेला, ओसाड जमिनीत तसेच डोंगर उतारांवर बहरलेला पळस निसर्ग सौंदर्यात मोलाची भर घालत आहे. पळसाची केशरी तांबडी फुले म्हणजे जणू निसगनि पेटवलेले दीपच असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते.
सकाळच्या कोवळ्या उन्हात ही झाडे अधिकच खुलून दिसतात, तर संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात पळसाच्या फुलांचा रंग अधिक गडद व आकर्षक भासतो. या फुलांमुळे विविध पक्षी, मधमाश्या, भुंगे आणि फुलपाखरे परिसरात आकर्षित होत असून, जैवविविधतेला चालना मिळत आहे. निसर्गातील ही साखळी पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे जाणकार सांगतात. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच निसर्गप्रेमींसाठी पळसाचा हा बहर आनंददायी आणि उत्साहवर्धक ठरत आहे. अनेक ठिकाणी नागरिक थांबून या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेताना दिसत असून, मोबाईल कॅमेऱ्यातून हे क्षण टिपण्याचाही मोह आवरत नाही.
होळी सणात पारंपरिक नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर केला जातो. आयुर्वेदात पळसाच्या फुलांपासून व झाडाच्या इतर भागांपासून विविध औषधे तयार केली जातात, ज्यांचा उपयोग अनेक आजारांवर केला जातो. वसंत ऋतूचे आगमन आणि पळसाच्या फुलांचा हा केशरी बहर निसर्गातील नवचैतन्याचे प्रतीक ठरत आहे. उन्हाळ्याच्या आगमनापूर्वीचा हा काळ म्हणजे निसर्गाचा उत्सवच असून, पळसाच्या फुलांनी संपूर्ण परिसर फुलून गेला आहे. निसर्गाशी नाते घट्ट करण्याची आठवण करून देणारा हा देखावा प्रत्येकाच्या मनाला आनंद देणारा ठरत आहे.
पूर्वी आम्ही पळसाच्या फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करायचो. रानातून फुले गोळा करून ती वाळवायचो, कुटून रंग बनवला जायचा. त्या रंगांनी होळी साजरी करताना वेगळाच आनंद मिळायचा. रसायनांचा वापर नव्हता, निसर्गाशी नातं अधिक घट्ट होतं. आज पळस फुललेला पाहिला की त्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. मात्र आजच्या पिढीला या गोष्टींचं फारसं महत्त्व उरलेलं नाही. मोबाईल आणि डिजिटल जीवनात गुंतल्यामुळे निसर्गाशी असलेलं नातं हळूहळ दुरावत चाललं आहे.- आबासाहेब निवदे, ग्रामस्थ