Crop Loans : जालना जिल्ह्यात फक्त १३ टक्के पीक कर्ज वाटप File Photo
जालना

Crop Loans : जालना जिल्ह्यात फक्त १३ टक्के पीक कर्ज वाटप

खरीप हंगामाच्या तोंडावर ८७ टक्के शेतकरी अजुनही प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा

Only 13% of crop loans disbursed in Jalna district.

जालना, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगाम सुरू होऊनही जालना जिल्ह्यात एकूण लक्ष्याच्या अवघे १३.१३ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. अद्यापी तब्बल ८७ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. पीक कर्ज कधी वाटप करणार असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे. गत हंगामात देखील पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य गाठणे अवघड झाले होते.

दरम्यान, चालू आठवड्याच्या आकडेवारीनुसार जालना जिल्ह्यात खरीप पीककर्जासाठी १,३०६.३० कोटी रुपयांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ १७१.५५ कोटी रुपये वितरित झाले आहेत. खरीप पेरणीसाठी आवश्यक असलेले कर्ज मे महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित असताना जूनचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी बँकांची गती वाढलेली दिसत नाही.

मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पुढील काही दिवसांत दमदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाऊस स्थिरावल्यानंतर पेरण्यांना वेग येणार आहे. मात्र त्याचवेळी पीककर्ज वितरणाची गती अशीच राहिली तर हजारो शेतकऱ्यांना खासगी सावकार किंवा महागड्या कर्जाचा आधार घ्यावा लागू शकतो. त्यामुळे बँकांनी तातडीने विशेष मोहीम राबवून पीककर्ज वितरणाला वेग देण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा "शेतकऱ्यांच्या विकासाच्या घोषणा" आणि "प्रत्यक्षातील कर्जवाटप" यातील विरोधाभास अधिक ठळकपणे समोर येणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २३.९६ टक्के प्रगती करत तुलनेने समाधानकारक कामगिरी केली असली तरी व्यापारी बँकांची स्थिती अत्यंत निराशाजनक आहे. सर्वाधिक ७८ ३.१६ कोटी रुपयांचे लक्ष्य असलेल्या व्यापारी बँकांनी केवळ ८३.१८ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून त्यांची प्रगती अवधी १०.६२ टक्के आहे. ग्रामीण बँकांची प्रगती १२.४० टक्के इतकी आहे.

विशेष म्हणजे काही बँकांनी तर अक्षरशः हात झटकले असल्याचे दिसते. इंडियन ओव्हरसीज बँकेची प्रगती केवळ ०.३४ टक्के, कॅनरा बँकेची २.७२ टक्के तर बँक ऑफ इंडियाची २.९६ टक्के इतकीच आहे. याउलट आयसीआयसीआय बँकेने ४१.०४ टक्के, एचडीएफसी बँकेने ३४.९९ टक्के आणि युको बँकेने २१.९१ टक्के प्रगती नोंदवली आहे.

मागील वर्षीही जिल्ह्यात पीककर्ज वाटप उद्दिष्टापेक्षा खूपच कमी राहिले होते. त्यातून कोणताही धडा न घेता यंदाही बँकांनी तोच ढिसाळपणा कायम ठेवला आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हास्तरीय बँकर्स समिती आणि लोकप्रतिनिधी यांचा बँकांवर कोणताही प्रभाव उरला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

उद्दिष्टपूर्तीसाठी बँकांना निर्देश जालना जिल्ह्याला १३०६.३० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत १७१.५५ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. १३.१३ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी बँकांना निर्देश देण्यात आले आहे.
- मंगेश केदार, व्यवस्थापक, अग्रणी बँक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT