Electric Wire Shock वीजेची तार लागल्यामुळे एकाचा मृत्यू, एक गंभीर file photo
जालना

Electric Wire Shock : वीजेची तार लागल्यामुळे एकाचा मृत्यू, एक गंभीर

भोकरदन शहरालगत एमआयडीसी परिसराला लागून असलेल्या जोमाळा परिसरात वाहनाला लोंबकळणारी विद्युत तार लागून झालेल्या दुर्घटनेत वाजिद रऊप शेख (वय २५, रा. जोमाळा) यांचा मृत्यू झाला

पुढारी वृत्तसेवा

One dead, one critically injured after coming into contact with an electric wire

भोकरदन : पुढारी वृत्तसेवा भोकरदन शहरालगत एमआयडीसी परिसराला लागून असलेल्या जोमाळा परिसरात वाहनाला लोंबकळणारी विद्युत तार लागून झालेल्या दुर्घटनेत वाजिद रऊप शेख (वय २५, रा. जोमाळा) यांचा मृत्यू झाला, तर त्याचे भाऊ जावेद रऊप शेख (वय २६, रा. जोमाळा) हे गंभीर जखमी झाले आहेत.

रविवारी घडलेल्या या दुर्घटनेमुळे जोमाळा परिसरातील धोकादायक वीजतारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, महावितरणच्या कथित दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

जोमाळा परिसरातील अनेक ठिकाणी वीज वाहक तारा लोंबकळलेल्या अवस्थेत असून, काही ठिकाणी या तारा जमिनीपासून अत्यंत कमी उंचीवर आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शेतकरी, शेतमजूर, वाहनचालक तसेच जनावरांसाठी या वीजतारा धोकादायक ठरत आहेत. धोकादायक वीजतारांबाबत महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांना वारंवार माहिती देण्यात आली. मात्र, त्यानंतरही आवश्यक दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

तीन महिन्यांपूर्वी मुलाला विजेचा धक्काविशेष म्हणजे, याच ठिकाणी सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका मुलाला लोंबकळणाऱ्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसला होता. त्यावेळीही संबंधित महावितरण कर्मचाऱ्यांना धोकादायक तारांबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्या घटनेनंतरही वीजतारा दुरुस्त करण्यात आल्या नसतील तर आणखी किती दुर्घटना घडण्याची वाट पाहिली जात आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दोन दिवसांपासून तुटलेली तार जमिनीवरदोन दिवसांपूर्वीही जोमाळा परिसरात एक विद्युत तार तुटून जमिनीवर पडली होती. याबाबतही संबंधित महावितरण कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, दोन दिवस उलटूनही तुटलेली तार हटविण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT