OBCs aggressive against GR for Maratha reservation
मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यात आल्याने संतप्त झालेल्या ओबीसी समाजबांधवांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शन आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
ओबीसी समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, २ सप्टेंबर २०२५ रोजी हैद्राबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याच्या विहित कार्यपध्दतीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयाव्दारे ओबीसी प्रवर्गात छुप्या पध्दतीने मराठा समाजाचा कुणबी प्रमाणपत्र देऊन घुसखोरी करण्याचा निर्णय झाल्याची भावना महाराष्ट्रातील ओबीसी-भटके विमुक्त समाजाची झालेली आहे. शासन निर्णयाचा निषेध म्हणून जालना जिल्हयातील सर्व ओबीसी-भटके, विमुक्त समाज बांधव शासनाच्या या निर्णयाचा निषेध करत आहोत.
अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील समाज बांधवांच्या आमरण उपोषणास समाजाचा पाठिंबा आहे. शासनाने या शासन निर्णयाचा योग्य पद्धतीने तत्काळ खुलासा करून हा शासन निर्णय परत घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जालना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ओबीसी समाज बांधवांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाज बांधवांच्यावतीने सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जीआर फाडण्यात आला.