'Not a speed breaker but a life breaker' on Jalna Road
प्रमोद अडसुळे
छत्रपती संभाजीनगर: शहराची जीवनवाहिनी असलेल्या जालना रोडवर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मनमानी पद्धतीने गरज नसलेल्या ठिकाणी गतिरोधक टाकले. आता हेच गतिर-ोधक वाहनधारकांची जीवावर उठले आहेत. आठ दिवसांपूर्वी विमानतळासमोरील गतिर-रोधक रात्रीच्यावेळी न दिसल्याने भरधाव दुचाकीस्वार त्यावर आदळून थेट पोलिसांच्या वाहनखाली येऊन चिरडला. विशेष म्हणजे २०२१ सालीही अशाच अपघातात गतिरोधकवर आदळून पडल्याने दाम्पत्य जखमी होऊन पती ठार झाला होता. त्यानंतर देखील प्रशासनाने हा धोकादायक गतिरोधक तसाच ठेवला आहे.
महामार्गावर स्पीड ब्रेकर बनवण्याचा कोणताही नियम नाही, तर सुरक्षेच्या कारणास्तव काही चिन्हांकित ठिकाणी ब्रेकर बनवण्यात आले आहेत, परंतु तेथेही मानकांची काळजी घेण्यात आलेली नाही. बहुतेक स्पीड ब्रेकर पांढरे किंवा पिवळे पट्टे टाकून रंगवलेले नाहीत, जे आहेत त्याचा रंग उडालेला आहे. ज्यामुळे दुचाकीस्वार किंवा वाहनचालकांना रात्री व दिवसा दुरून ब्रेकर दिसत नाहीत. यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. जालना रोडवर केम्ब्रिज चौक ते महावीर चौक दरम्यान विमानतळ, आकाशवाणी चौक, अमरप्रीत चौक या ठिकाणी मोठ्या उंचीचे सदोष गतिरोधक टाकण्यात आले आहेत. हे गतिरोधक नियमांची पायमल्ली करणारे आहेत. दुचाकीस्वार या गतिरोधकवर हमखास आदळतो. यामुळे तोल जाऊन पडल्याचा धोका निर्माण होत आहे. गतिर-ोधकाची उंचीही अधिक असल्याने वाहन जाताना आढळते. यामुळे दुचाकीस्वार तोल गमावतात आणि अपघातांना बळी पडतात. तीन चाकी आणि चार चाकी वाहनांचेही संतुलन बिघडते. विशेषतः विमानतळासमोर टाकण्यात आलेला गतिर-ोधक हा जीवघेणा ठरला आहे. या ठिकाणी आतापर्यंत दोघांची बळी गेला आहे.
हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालय अशा ठिकाणी खरे तर गतिरोधक असणे गरजेचे आहे. मात्र चिकलठाण्यातील जिल्हा रुग्णालय, आकाशवाणी जवळील एसएफएस शाळा, केम्ब्रिज चौक आदी ठिकाणी सुसाट वाहने दामटली जातात. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात अपघात घडतात. निकष पूर्ण करणारे गतिरोधक टाकण्याची खरी गरज असलेल्या ठिकाणी मात्र, प्रशासन कानाडोळा करते.
इंडियन रोड काँग्रेसच्या स्पीड ब्रेकर्ससाठीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, स्पीड ब्रेकरची कमाल उंची ४ इंच असावी. ब्रेकरच्या दोन्ही बाजूंना २-२ मीटरचा उतार असावा जेणेकरून वाहनाचा वेग कमी होईल आणि धक्का न लावता पुढे जाईल. ६ ते ८ इंच उंचीचे आणि उतार नसलेले ब्रेकर बनवू नयेत. स्पीड ब्रेकरसमोर इशारा देणारे फलक लावावेत. तसेच, ब्रेकरमध्ये पांढरा किंवा पिवळा रंग आणि रेडियम असावा, जेणेकरून ब्रेकर दिवसा आणि रात्री दूरवरून वाहनचालकांना दिसू शकेल.
जालना रोडवरील हे गतिरोधक नियम पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. या गतिरोधकांमुळे नागरिकांना पाठीदुखी, मणक्याचे आजार उद्भवत आहेत. इंडियन रोड काँग्रेसच्या नियमांची पायमल्ली करत गतिरोधक तयार झाले. त्यामुळे वाहनचालकासह नागरिकांना पाठ आणि कंबरदुखीचा त्रास होऊ लागला आहे. अपघात होऊन अनेकांच्या वाहनांचे नुकसान होत असून काहींचा अपघातात मृत्यूदेखील झाला आहे.
जालना रोडवर गतिरोधक हे वाहतूक पोलिस यांनी जिथे मागणी केली तिथे नियमांप्रमाणे बसवून दिलेले आहेत. अपघाताचे झोन, रस्ता ओलांडण्यासाठी अडचण अशाच ठिकाणी टाकले आहेत. तसेच जालना रोडवरील झेब्रा क्रॉसिंगसाठी मंडळ कार्यालयाला प्रस्ताव पाठिवला आहे. लवकरच काम पूर्ण करू.- राम ढाकणे, सहायक कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग
नागरिक संबंधित मनपा प्रशासनाला गतिरोधक टाकण्याची मागणी करतात. मनपा आमच्याकडे मागणी केल्यानंतर आम्ही पत्र देतो. तसेच ज्या ठिकाणी वाहने वेगाने जाऊन अपघाताचा धोका संभवतो अशाच ठिकाणी आमच्याकडून गतिरोधक टाकण्यासाठी परवानगी दिले जाते.- धनंजय पाटील, एसीपी, वाहतूक शाखा
जालना रोडवर इशारा फलक पडले अडगळीला
गतिरोधकांपासून काही अंतरावर सुरुवातीला असणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांचा रंग उडाला.
अनेक ठिकाणी थेट गतिरोधकावर पांढरे पट्टे पण त्यांचाही रंग उडाला.
रात्रीच्या वेळी सोडा दिवसाही गतिरोधक दुरून दिसत नाहीत.
गतिरोधकांच्या ठिकाणी रेडियमचा वापर करण्यात आलेला नाही.
नेहमीच्या लोकांशिवाय बाहेरून येणार नवखा दुचाकीस्वार हमखास गतिरोधकवर आदळतो.
अनेक ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचा रंग उडाला.
अपघातांच्या दोन प्रमुख घटना
▶▶ ७ जानेवारी २०२१
साली सुरेश देवीदास जाधव (४०, रा. आशानगर, चिकलठाणा) हे पत्नीसह मोंढा नाका परिसरातील नातेवाइकांच्या घरी भेटण्यास गेले होते. रात्री ११:३० वाजेच्या सुमारास जाधव दाम्पत्य मोटारसायकलने घरी जात होते. विमानतळासमोरील गतिरोधक त्यांना दिसला नाही. गतिरोधकावर दुचाकी जोराने आदळली आणि ते दुचाकीसह घसरून रस्त्यावर पडले. या घटनेत सुरेश यांचा मृत्यू झाला होता. तर पत्नीही गंभीर जखमी झाली होती.
▶ १६ जून २०२५
रोजी विष्णू काशिनाथ खर्जुले (२६, रा. करमाड) हा तरुण मित्राच्या आईला रुग्णालयात जेवणाच डब्या देऊन करमाडकडे निघाला होता. विमानतळासमोर गतिरोधकवर त्याची दुचाकी जोरात आदळली. त्याचा तोल जाऊन बाजूच्या दुचाकीच्या धक्क्याने तो थेट एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या वाहनाखाली येऊन चिरडला गेला. यात गंभीर जखमी विष्णूचा मृत्यू झाला.