No time has been found to open soybean purchasing center
आन्वा, पुढारी वृत्तसेवा: यंदा तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना एकरी केवळ दोन ते तीन क्विंटल उत्पादन मिळाले आहे. त्यातच बाजारभाव घटल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
बाजार शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या हमीभावानुसार सोयाबीनचा दर प्रति क्विंटल ५ हजार ३२८ रुपये निश्चित करण्यात आला असला तरी अद्याप आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. भोकरदन तालुक्याच्या ठिकाण समित्यांमध्ये सध्या खासगी व्यापाऱ्यांकडून सोयाबीनला प्रतिक्विंटल ३ हजार ७०० ते ४ हजार रुपये दर मिळत आहे.
हमीभाव ५ हजार ३२८ इतका निश्चित करण्यात आला आहे. परंतु आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कमी दराने सोयाबीन विकावे लागत आहे. खरेदी केंद्र सरू होण्याची तारीख जाहीर होण्यास विलंब लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
यंदा अतिवृष्टी, मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. डोळ्यादेखत उभे सोयाबीन पीक पाण्यात बुडून चक्क शेंगांना झाडावरच कोंब फुटण्याचा प्रकार घडला. त्यातच सोयाबीनचा दर ३ हजार ७०० ते ४ हजार रुपये भावापर्यंत विक्री करीत आहेत. तर एकरी उत्पादनात निम्म्यापेक्षा अधिक घट होऊन झाल्याने शेतकऱ्यांना एकरी २ ते ३ क्विंटल इतकेच सोयाबीन झाले.
कमी दराने विक्री
रब्बी हंगामात खर्चाची तरतूद म्हणून शेतकरी बाजारात कमी दराने सोयाबीन विकत आहेत. परंतू जवळचे संपूर्ण सोयाबीन संपल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.