

Take immediate action against lumpy disease MP Kalyan Kale
जालना, पुढारी वृत्तसेवा : जनावरांना होत असलेल्या लंपी स्किन डिसीज या संसर्गजन्य आजारामुळे हजारो जनावरे बाधित होत असून अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. कल्याण काळे यांनी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून तत्काळ वैद्यकीय मदत, लसीकरण मोहीम आणि विशेष आर्थिक सहाय्याची मागणी केली आहे.
डॉ. काळे यांनी पत्रात नमूद केले आहे की, "शेतकरी अतिवृष्टी, उत्पादन खर्च वाढ आणि पिकांचे नुकसान यामुळे संकटात सापडलेला आहे. अशा परिस्थितीत लंपी आजारामुळे त्यांच्या उपजीविकेचा आधार असलेले पशुधनच धोक्यात आले आहे.
शासनाने मानवी दृष्टिकोनातून तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा." तसेच त्यांनी जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांना पत्र देऊन बाधित गावांमध्ये विशेष वैद्यकीय पथके नेमून तपासणी, उपचार आणि लसीकरण मोहीम राबविणे, लंपी आजारग्रस्त जनावरांना मोफत वैद्यकीय सेवा व औषधोपचार उपलब्ध करून देणे, मृत जनावरांच्या मालकांना विशेष आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
पशुधनाचे रक्षण म्हणजे आयुष्याचे रक्षण
पशुधनाचे रक्षण म्हणजे त्यांच्या आयुष्याचे रक्षण. शासनाने तत्काळ निर्णय घेऊन जनावरांना वैद्यकीय मदत आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे अत्यावश्यक आहे असे पत्रात डॉ. कल्याण काळे यांनी म्हंटले आहे.