

Jalna Chinchkheda Sarpanch Motion of no confidence
जाफराबाद : पुढारी वृत्तसेवा
जाफराबाद तालुक्यातील निवडा चिंचखेडा येथील सरपंच सविता भालचंद्र सरोदे यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. यासाठी ६ नोव्हेंबर रोजी पीठासन अधिकारी तहसीलदार सारिका भगत यांच्या उपस्थितीत विशेष बैठक बोलवण्यात आली होती. यामध्ये स्वतः सरपंच वगळून सर्वच्या सर्व ९ सदस्यांनी अविश्वासच्या बाजूने मतदान नोंदवून सरपंच सविता सरोदे यांच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे ९ विरुद्ध १ असा हा अविश्वास ठराव पारित झाला.
सरपंच यांच्या कार्य शैलीवर आक्षेप घेत सरपंच पती यांचा ग्रामपंचायत कारभारात वाढता हस्तक्षेपामुळे सदस्यांनी हा अविश्वास दाखल केला होता. ३ वर्षांपूर्वी सविता भालचंद्र सरोदे या जनतेतून निवडून आल्या होत्या. परंतु निवडणूक झाल्यापासूनच सदस्य व सरपंच यांच्यात सतत अंतर्गत संघर्ष सुरू होता. परिणामी ग्रामपंचायतीत गेली ३ वर्ष पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. सरपंच पतीचा वाढता हस्तक्षेपामुळे या सर्व ९ सदस्यांनी विरोधात जाऊन अविश्वास दाखल केला होता. सरपंच पदाचा कार्यकाळ संपण्यास अद्याप २ वर्ष बाकी असल्याने नवीन होणाऱ्या सरपंचास गाव विकास करण्याची संधी मिळणार आहे. बहुतमाने अविश्वास पारित करण्यात आला.
यांची उपस्थिती
या बैठकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार सारिका भगत, महसूल सहायक खांडेभराड, ग्राममहसूल अधिकारी सागर शेळके, ग्रामविकास अधिकारी इंगळे उपस्थित होते.