पारध - सागर राजे देशमुख
स्वातंत्र्याची पहाट उगवली; मात्र हैदराबाद संस्थानातील मराठवाड्याला निजामाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी संघर्षाची धग कायम होती. निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध रझाकारांशी दोन हात करत असताना मराठवाड्यातील असंख्य गावांनी प्रतिकाराची मशाल पेटवली. या संघर्षाच्या इतिहासात पारध, पिंपळगाव रेणुकाई आणि परिसरातील मातीनेही आपल्या शौर्याची ठसठशीत नोंद केली, अशा आठवणी आजही ज्येष्ठांच्या स्मरणात जिवंत आहेत.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. स्वातंत्र्यसैनिक तथा माजी जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष विश्वासराव देशमुख यांनी मुक्तिसंग्रामातील अनेक थरारक प्रसंगांच्या आठवणी सांगितल्या होत्या. रझाकारांच्या अत्याचाराला न घाबरता सामान्य नागरिक, शेतकरी आणि मुक्तिसैनिकांनी दिलेला प्रतिकार हा या परिसराच्या इतिहासातील अभिमानाचा अध्याय असल्याचे या स्मरणांतून पुढे येते.
धामणगावातील दोन तासांचा गोळीबार
१५ मे १९४८ रोजी धामणगाव येथे रझाकार व निजामी लष्कराच्या तुकडीने गोळीबार सुरू केला. त्याला मुक्तिसैनिकांनीही प्रत्युत्तर दिले. सुमारे दोन तास दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. या संघर्षाच्या काळात पारध येथील निवृत्त नायब सुभेदार वीर वामनराव लोखंडे यांनी मुक्तिसैनिकांना रायफल हाताळण्याचे प्रशिक्षण देत रझाकारांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज केले.
पिंपळगाव रेणुकाई येथील विश्वासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुक्तिसैनिकांनी केलेल्या प्रतिकारात दोन फौजी ठार, तर एक जखमी झाल्याचे स्मरण वर्णन आहे. जखमी फौजीचा पुढे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचेही सांगितले जाते. या प्रतिकारानंतर रझाकार व लष्करी तुकडीने माघार घेतल्याची आठवण स्थानिकांकडून सांगितली जाते.
पिंपळगाव रेणुकाईला वेढा; चावडीवरून प्रतिकार
२७ जुलै रोजी पिंपळगाव रेणुकाईला रझाकारांनी वेढा घातल्याचे स्थानिक स्मरणांत नमूद आहे. पोलिस पाटील कीर्तिकाराव देशमुख, अहेर, मोतीला मल्लसेड आणि प्यारेलाल यांना बांधून मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जाते.
याचवेळी किसनराव देशमुख, विश्वासराव देशमुख, नारायणराव देशमुख, जानू खाडे, रस्तुमराव देशमुख, फुलसिंग राजपूत, कडूबा चव्हाण आणि वामन पोतदार यांनी चावडीवरून गोळीबार करत प्रतिकार केला. या प्रतिकारामुळे रझाकारांना माघार घ्यावी लागल्याची आठवण आजही सांगितली जाते.
वालसा वडाळा गढीनेही अनुभवला संघर्ष
१४ सप्टेंबर १९४७ रोजी शेख हबीब चाऊस व अरब रझाकारांनी वालसा वडाळा गढीवर हल्ला केल्याचे स्मरणवर्णन आहे. गावाला वेढा घालून गोळीबार करण्यात आला. त्यावेळी फकिरा काळे यांनी गढीचा प्रतिकार केला. गढीवरून गोफणीने दगडांचा मारा करण्यात आला तर मुक्तिसैनिकांनीही प्रतिहल्ला केल्याचे सांगितले जाते.
या संघर्षात रझाकारांचे काही साथीदार जखमी झाल्याचे स्थानिक आठवणींत नमूद आहे. निजामी सत्तेच्या दहशतीसमोर गावकऱ्यांनी दाखविलेल्या धैर्याचा हा प्रसंग आजही मुक्तिसंग्रामाच्या स्मृतीत महत्त्वाचा मानला जातो.
देहेड्यावरील हल्ला; गढी ताब्यात
२७ मार्च १९४८ रोजी हिसोड्याचा अब्दुल मिर्झा, देहेड्याचा बुढन मिर्झा आणि दानापूरचा अब्दुल लतीफ या रझाकारांनी सहकाऱ्यांसह देहेड्यावर हल्ला केल्याचे स्मरणवर्णन आहे. गावातील गढीचा ताबा घेण्यात आला. त्यानंतर कल्याणी येथे महिलांना कोंडून ठेवण्यात आल्याचा उल्लेखही स्थानिक स्मरणांत आढळतो. या घटनांनी त्या काळातील सामाजिक अस्थिरता, भीतीचे वातावरण आणि त्याविरोधात उभा राहिलेला स्थानिक प्रतिकार अधोरेखित होतो.
वीर वामनराव लोखंडे ठरले मुक्तिसैनिकांचे ‘लष्करी गुरू’
मुक्तिसंग्रामाच्या या धगधगत्या काळात पारधचे वीर वामनराव लोखंडे यांची भूमिका विशेष ठरते. लष्करातून नायब सुभेदार म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मुक्तिसैनिकांना लष्करी प्रशिक्षण देण्याचे काम स्वीकारले. देऊळगावराजा, जांभोरा, गिड्डा आणि डोंगरसेवली परिसरात कॅम्प उभारून त्यांनी तरुणांना लष्करी डावपेचांचे प्रशिक्षण दिल्याचे सांगितले जाते. प्रशिक्षण देण्याबरोबरच अनेक मुक्तिसैनिकांसोबत संघटनेच्या सीमेत जाऊन त्यांनी प्रत्यक्ष चकमकींमध्ये सहभाग घेतल्याचेही स्थानिक स्मरणांत नमूद आहे.
पारधच्या मातीतील शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास केवळ मोठ्या शहरांतील आंदोलनांचा इतिहास नाही. खेड्यापाड्यातील सामान्य माणसाने अन्यायाविरुद्ध उभे राहून दिलेला लढा हा या इतिहासाचा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. पारध, पिंपळगाव रेणुकाई आणि परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाच्या आठवणी त्याचीच साक्ष देतात.
आज मुक्तिसंग्रामाच्या स्मृतींना उजाळा देताना या स्थानिक इतिहासाचे दस्तऐवजीकरण होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांकडील कागदपत्रे, ज्येष्ठांच्या आठवणी, तत्कालीन सरकारी नोंदी आणि उपलब्ध ऐतिहासिक पुरावे यांचे संकलन करून ‘पारध संग्राम’ची स्वतंत्र ऐतिहासिक नोंद जतन करण्याची गरज आहे.
रझाकारांच्या दहशतीसमोर न झुकता स्वातंत्र्याची आस जपणाऱ्या त्या पिढीने दिलेला लढा हा केवळ इतिहास नाही; तो अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि आपल्या मातृभूमीसाठी त्याग करण्याची प्रेरणादायी परंपरा आहे. या शौर्यगाथेचे स्मरण करणे आणि ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, हीच त्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना खरी आदरांजली ठरेल.