परतूर ः उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड यांना निवेदन देताना ग्रामस्थ.  pudhari photo
जालना

Nandra village water shortage : दलित वस्तीत पाण्यासाठी वणवण

नांद्रा ः पाणीप्रश्न न सुटल्यास आमरण उपोषणाचा इशारा; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

परतूर ः एकीकडे दुधना नदी दुथडी भरून वाहत असताना, दुसरीकडे याच नदीच्या तीरावरील नांद्रा (ता. परतूर) येथील दलित वस्तीला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. “धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी काहीशी अवस्था येथील ग्रामस्थांची झाली आहे.

हंडाभर पाण्यासाठी महिला व बालकांना रणरणत्या उन्हात मैलोन्‌‍मैल पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाच्या या उदासीन धोरणाविरोधात नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रश्न न सुटल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नांद्रा गावातील दलित वस्तीत 60 ते 70 कुटुंबे वास्तव्यास आहेत. गेल्या वर्षभरापासून या वस्तीत पाण्याचा थेंबही पोहोचलेला नाही. वस्तीतील दोन हातपंप दीर्घकाळापासून नादुरुस्त अवस्थेत आहेत.

विशेष म्हणजे, एका पंपावर विद्युत मोटार बसवून पाणीपुरवठा सुरळीत करणे अपेक्षित असताना, तेथे चक्क दगड ठेवून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत गावात जलकुंभ तर उभा राहिला, मात्र तो केवळ शोभेची वास्तू ठरला असून त्यात अद्याप पाण्याचा थेंबही आलेला नाही.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार, जिजाभाऊ आखाडे, पुंजाराम आखाडे, गणेश हिवाळे, गौतम लहाणे, विठ्ठल आखाडे, बाबासाहेब आखाडे, राजू हिवाळे व ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाव्दारे इशारा दिला आहे.

तहानलेल्या वस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

पिण्याच्या पाण्याची तातडीने सोय न झाल्यास उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आता प्रशासन या तहानलेल्या वस्तीची दखल घेणार की ग्रामस्थांना उपोषणाचे हत्यार उपसावे लागणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT