जालना : नगरसूल–तारूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत एकूण १६ दिवसांचा ब्लॉक मंजूर करण्यात आला आहे.
या कामात दुहेरीकरणासोबतच विद्युतीकरण आणि सिग्नलिंगची कामेही करण्यात येणार आहेत. त्यामुळे जालना–नगरसूल मार्गावरील काही प्रवासी गाड्या रद्द, काही गाड्यांच्या फेऱ्या अंशतः रद्द, तर काही गाड्या उशिराने धावणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड मंडळाने याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
गाडी क्रमांक ७७६१९ जालना–नगरसूल पॅसेंजरच्या १, ३, ७, ८ आणि १० डिसेंबरच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ७७६२० नगरसूल–जालना पॅसेंजरच्या याच तारखांच्या फेऱ्याही रद्द राहणार आहेत. तसेच गाडी क्रमांक ७७६२१ जालना–नगरसूल डेमूच्या २, ४, ५, ६ आणि ९ डिसेंबरच्या फेऱ्या, तर गाडी क्रमांक ७७६२२ नगरसूल–जालना डेमूच्या याच तारखांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे जालना–नगरसूल दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या बदलांची विशेष नोंद घ्यावी लागणार आहे. गाडी क्रमांक १६००३ चेन्नई–नगरसूल एक्स्प्रेसची ६ डिसेंबरची फेरी रोटेगाव–नगरसूलदरम्यान अंशतः रद्द राहील.