Municipal election: The sale of nomination forms has crossed three thousand; today is the last date.
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज खरेदी व दाखल करण्याच्या प्रक्रियेला सोमवारी वेग आला. गेल्या पाच दिवसांत उमेदवारी अर्ज विक्रीने ऐतिहासिक टप्पा ओलांडत 3 हजारांचा आकडा पार केला आहे. आजपर्यंत एकूण 3 हजार 23 उमेदवारी अर्जा विक्री झाली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांत उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
निवडणूक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, सोमवार दि. 29 रोजी शहरातील 1 ते 16 प्रभागांमधून 536 नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. 23 डिसेंबरपासून सुरू झालेल्या प्रक्रियेत राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी पूर्ण होताच अर्ज खरेदीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे.
अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतही सोमवार दि.29 रोजी मोठी वाढ झाली. सकाळपासूनच पाचही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये उमेदवार व समर्थकांच्या रांगा लागल्या होत्या. आज एकाच दिवशी 252 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची एकूण संख्या 300 झाली आहे. शेवटचा दिवस जवळ आल्याने मंगळवारी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंगळवार, दि. 30 रोजी हा उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीचा अंतिम दिवस आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने वेळेबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नवीन कोरे अर्ज विक्री : दुपारी 2 वाजेपर्यंत तर भरलेले अर्ज दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. विहित वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असा इशारा निवडणूक प्रशासनाने दिला आहे.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पाचही केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक अर्जाची तांत्रिक तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत असून, आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे.